इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच कृणालने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. या सामन्यात भारताने तीनशेपार धावा करत सामना 66 धावांनी खिशात घातला. या सामन्याद्वारे कृणालने सर्वांची वाहवा मिळवली. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो गोलंदाजीत अपयशी ठरला. शिवाय, भारतीय गोलंदाजांच्या अपयशामुळे इंग्लंडने दुसरा सामना सहज जिंकला.

या सामन्यानंतर माजी भारतीय खेळाडूंनी कृणालच्या  भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली. कृणाल हा एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाज नसून तो दहा षटके फेकण्यास सक्षम  नाही, असे मत क्रीडापंडितांकडून समोर आले. भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनेही अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला लक्ष्मण?

एका वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या स्तंभात लक्ष्मण म्हणाला, ”कृणाल पंड्या दहा षटके फेकणारा गोलंदाज आहे, हे मला मान्य नाही. विशेषतः जेव्हा खेळपट्टी सपाट असते. संघाला दुसर्‍या गोलंदाजाची आवश्यकता आहे. विराटला अनेक गोष्टींचे मिश्रण करायचे असते, मग भलेही ते त्याच्या योजनांच्या बाहेरचे असेल. दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू आपल्या गोलंदाजीत दिशाहीन होते.”

लक्ष्मणपूर्वी सुनील गावसकर यांनीही अशाच आशयाचे विधान केले होते. कृणाल पंड्या भारतीय संघासाठी पाचव्या गोलंदाजची भूमिका साकारू शकत नाही. तो फक्त चार ते पाच षटके करू शकतो”, असे गावसकर म्हणाले होते.

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी कृणाल पंड्याच्या 6 षटकात 72 धावा वसूल केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कुलदीप यादवही चांगला महागडा ठरला. सपाट खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून आली. त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर स्पष्टपणे दिसून येतो.