अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आपल्या देशातील एका १०० वर्षीय चाहत्याला खूश केले आहे. मेस्सी एक जागतिक प्रतीक असून जगभरात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. डॉन हर्नन हे मेस्सीच्या सर्वात जुन्या चाहत्यांपैकी एक आहेत आणि अगदी सुरुवातीपासूनच ते मेस्सीच्या कारकीर्दीचे अनुसरण करत आहे. मेस्सीच्या कारकीर्दीतील आतापर्यंतचे सर्व गोल हर्नन यांनी त्यांच्या एका नोटबुकमध्ये नोंदवून ठेवले आहेत.

हर्नन मेस्सीचा कोणताही सामना चुकवत नाही. जर एखादा सामना त्यांची चुकवला तर ते आपल्या नातवाला सामन्याबद्दल विचारतात. त्यांचा नातू ज्युलियनने एक व्हिडिओ शेअर करून त्यांना टिकटॉकवर लोकप्रिय केले आहे. ज्युलियनने आपल्या आजोबांचा संदेश मेस्सीपर्यंत पोहोचवला.

 

यानंतर मेस्सीने हर्नन यांचे आभार मानले आहेत. मेस्सी म्हणाला, ”हॅलो हर्नन. तुमची कहाणी माझ्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्ही केलेल्या कार्याबद्दल मला तुम्हाला एका मिठी मारायची आहे. आपण जे काही केले त्यासाठी खरेच धन्यवाद.”

मेस्सीचे स्वप्न झाले साकार

तब्बल २८ वर्षांची प्रतीक्षा संपवत अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळलेल्या अर्जेंटिनाने बलाढ्य ब्राझीलला १-०ने नमवले. अँजेल डि मारियाच्या गोलमुळे अर्जेंटिनाचे स्वप्न साकार झाले. सामना संपल्यानंतर लिओनेल मेस्सी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो मैदानावरच रडू लागला. १६ वर्षांच्या कारकीर्दीतील हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद होते.

हेही वाचा – मोठी बातमी..! टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान असणार आमनेसामने

यापूर्वी १९९३ साली अर्जेंटिनाने ही स्पर्धा जिंकली होती. इक्वाडोर इथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यावेळी अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. २०१५ व २०१६ मध्ये अर्जेंटिनाने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. मात्र, चिलीकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तब्बल २८ वर्षांपासून अर्जेंटिनाला विजयाची आस होती, यंदाच्या स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने प्रतिक्षा संपली.