विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. यामुळे बंगळुरुच्या संघात आनंदाचे वातावरण आहे. बुधवारी (उद्या) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाचा सामना करणार आहे. मागील आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी बंगळुरुचा संघ उत्सुक आहे. या सामन्याआधी विराट कोहली बंगळुरुच्या कॅम्पमध्ये दाखल झाल्याने संघात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे. बंगळुरुच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन कोहली संघातील खेळाडूंना भेटत असल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत असताना विराट कोहलीचा खांदा दुखावला होता. त्यामुळे कोहली चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. खांद्याच्या दुखापतीमुळे विराट कोहली आयपीएलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही. मात्र बंगळुरुच्या यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या सामन्यापूर्वी कोहलीने संघातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले.


विराट कोहलीने बंगळुरुच्या खेळाडूंची भेट घेत त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी कोहलीच्या चेहऱ्यावर आनंद होता. बंगळुरुचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला मिठी मारत कोहलीने आयपीएलच्या मोसमासाठी शुभेच्छा दिल्या. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि बंगळुरुचा खेळाडू मिल्सदेखील व्हिडिओमध्ये सोफ्यावर बसलेला दिसतो आहे. बंगळुरुने १२ कोटी रुपये मोजून मिल्सला आपल्या संघात घेतले आहे.

न्यूझीलंडचा गोलंदाज अॅडम मिलनेदेखील व्हिडिओमध्ये दिसतो आहे. मिलने आणि कोहली व्हिडिओमध्ये हस्तांदोलन करताना दिसत आहेत. रांची कसोटीत खांद्याला दुखापत झाल्याने कोहली आयपीएलचे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती.

बंगळुरुच्या संघाला सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीची अनुपस्थित जाणवेल. कोहलीने मागील आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. यासोबतच चार शतके झळकवण्याचा पराक्रमदेखील कोहलीने केला होता. कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार शेन वॉटसन बंगळुरु संघाचे नेतृत्व करेल. कोहलीसोबतच डिव्हिलीयर्सदेखील सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नसल्याने संघाची धुरा वॉटसनकडे सोपवण्यात आली आहे.