आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत महेंद्रसिंह धोनीला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आलेली नाही. मात्र आपल्या यष्टीरक्षणातील सर्वोत्तम कामगिरीमुळे धोनीच्या कामगिरीबद्दल अजुनही कोणीही शंका निर्माण केलेली नाहीये. २०१७ सालात धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत असताना कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीला आपला पाठींबा दिला. यानंतर निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी २०१९ विश्वचषकापर्यंत धोनीचं यष्टीरक्षणासाठी पहिली पसंती राहणार असल्याचं स्पष्ट केलं आणि धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा थंड झाल्या.

अवश्य वाचा – ‘कुलदीप, चहलच्या यशाचं श्रेय धोनीला मिळालं पाहिजे’

भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि यष्टीरक्षक किरण मोरे यांनीही धोनीला आपला पाठींबा दिला आहे. एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोरे यांनी धोनीला संघात पर्याय नसल्याचं सांगितलं आहे. “एक खेळाडू म्हणून धोनी संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाड़ू आहे. धोनी संघात असल्याचा तरुण फिरकीपटूंनाही खूप फायदा होतो. धोनी यष्टींमागून कुलदीप, युझवेंद्र सारख्या खेळाडूंना कशी गोलंदाजी करावी याचेही धडे देतोय. त्यामुळे धोनीला संघात सध्यातरी पर्याय नाही.” धोनीच्या संघातील जागेबद्दल विचारलं असताना किरण मोरे बोलत होते.

आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेत धोनीने चौथ्या सामन्यात ४२ धावांची खेळी केली होती. मात्र मैदानात गोलंदाजांना मार्गदर्शन करताना किंवा कोहलीला कर्णधार म्हणून मैदानात वावरताना धोनी नेहमी सल्ले देताना दिसतो. “गेली अनेक वर्ष धोनी भारतीय संघाची कमान सांभाळतो आहे. आता कर्णधारपद कोहलीच्या हातात गेल्यानंतर तो आपल्या फलंदाजीकडे लक्ष देऊ शकतो. तसेच मैदानातलं क्षेत्ररक्षण, कोहली आणि गोलंदाजांना योग्य ते सल्ले देणं या सर्व गोष्टी तो अधिक चांगल्या पद्धतीने करु शकतो.” किरण मोरेंनी धोनीचं कौतुक केलं.

सध्या भारत आणि आफ्रिका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. यातला पहिला सामना जिंकून भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उरलेल्या दोन सामन्यांमध्ये भारत कसा खेळ करतो, आणि महेंद्रसिंह धोनी कशी कामगिरी करतो याक़डे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – भारताकडून टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने, पहिल्या सामन्यात आफ्रिकेवर २८ धावांनी मात