भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट कसोटीत दुसऱ्या दिवसाच्या खेळात शतक झळकावलं. कसोटी क्रिकेटमधलं कोहलीचं हे २४ वं शतक होतं. विराटने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजसमोर ६४९ धावांचं मोठं आव्हान ठेवलं. विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

० – विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये भारतात खेळताना आतापर्यंत सर्वात जलद ३ हजार धावांचा टप्पा गाठता आलेला नाहीये. विराटने ५३ डावांमध्ये ही कामगिरी करुन चेतेश्वर पुजाराच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

१ – सलग ३ वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १ हजारापेक्षा जास्त धावा काढणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे. याचसोबत अशी कामगिरी करणारा विराट पहिला भारतीय खेळाडूही ठरला आहे.

अवश्य वाचा – कॅप्टन कोहलीचा धडाका सुरुच, विंडीजविरुद्ध शतकी खेळीची नोंद

१ – २०१८ सालात कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.

२ – कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २४ वं शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर. विराटने १२३ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे, तर डॉन ब्रॅडमन यांनी ही कामगिरी अवघ्या ६६ डावांमध्ये केली होती.

२ – भारतीय कर्णधारांपैकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ २ फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंह धोनी हे कर्णधार विराट कोहलीच्या पुढे आहेत. विराटने कालच्या खेळीदरम्यान सौरव गांगुलीला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं.

३ – कर्णधार या नात्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर. या यादीत रिकी पाँटींग ४१ शतकांसह पहिल्या तर ग्रॅम स्मिथ ३३ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

६ – कसोटी क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट कोहली सहावा खेळाडू. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने सलग ५ वर्ष ही कामगिरी केली होती. तर स्टिव्ह स्मिथने आतापर्यंत अशी कामगिरी ४ वेळा केली आहे. मार्क्स टेस्कॉथिक, ब्रायन लारा, केविन पीटरसन आणि विराट कोहली यांनी सलग ३ वर्ष अशी कामगिरी केली आहे.

९ – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट सध्या नवव्या स्थानावर पोहचला आहे.

७४९ – भारतामध्ये कसोटी क्रिकेट खेळत असताना शेवटच्या ५ डावांमध्ये विराटने ७४९ धावा काढल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाहीये. गेल्या ५ डावांमधली विराट कोहलीची कामगिरी आहे, १०४ नाबाद, २१३, २४३, ५०, १३९