कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून मात केली आहे. ७ गडी राखून पहिला सामना जिंकत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विंडीजने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९४ तर लोकेश राहुलने ६२ धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली होती. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत महत्वपूर्ण भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. यादरम्यान लोकेश राहुलने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपलं अर्धशतकही साजरं केलं. तो ६२ धावा काढून माघारी परतला.

अवश्य वाचा – IND vs WI : लोकेश राहुल टीम इंडियाचा नवा हजारी मनसबदार

यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताचं आव्हान कायम ठेवलं. ऋषभ पंतनेही फटकेबाजी करत १८ धावा केल्या. पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतला. यानंतर विराटने शिवम दुबेच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ८ चेंडू बाकी ठेवत भारताने या सामन्यात बाजी मारली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला हा भारताचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग ठरलेला आहे. विंडीजकडून पेरीने २ तर कायरन पोलार्ड आणि शेल्डन कोट्रलने १ बळी घेतला.

त्याआधी, शेमरॉन हेटमायरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला एविन लुईस आणि कायरन पोलार्डने दिलेल्या दमदार साथीच्या जोरावर पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने २०७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लेंडल सिमन्सला माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली होती. मात्र लुईस-हेटमायर आणि पोलार्ड या त्रिकुटाने हैदराबादच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं.

अवश्य वाचा – IND vs WI : एविन लुईसची धडाकेबाज खेळी, भारताविरुद्ध विक्रमाची नोंद

लेंडल सिमन्स दिपक चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लुईसने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत फटकेबाजी सुरुवात केली. पाचव्या षटकात विंडीजने ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला. ४० धावांवर एविन लुईस वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ब्रँडन किंग आणि हेटमायर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. किंग माघारी परतल्यानंतर हेटमायरनेही भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत आपल्या संघाचं पारडं जड केलं. त्याला कर्णधार पोलार्डनेही उत्तम साथ दिली. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेलही सोडले. भारताकडून युजवेंद्र चहलने २ तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – IND vs WI : टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहर नकोशा विक्रमाचा धनी

Live Blog

22:32 (IST)06 Dec 2019
षटकार खेचत विराट कोहलीकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

६ गडी राखून भारत सामन्यात विजयी, विराट कोहलीच्या नाबाद ९४ धावा

22:26 (IST)06 Dec 2019
भारताला चौथा धक्का, श्रेयस अय्यर माघारी

कायरन पोलार्डने स्वतःच्या गोलंदाजीवर घेतला श्रेयसचा झेल

22:14 (IST)06 Dec 2019
भारताला तिसरा धक्का, ऋषभ पंत माघारी

शेल्डन कोट्रलच्या गोलंदाजीवर पंत छोटेखानी खेळी करत माघारी

22:07 (IST)06 Dec 2019
कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक

ऋषभ पंतच्या साथीने विराटची अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी

अर्धशतक झळकावत भारताचं आव्हान ठेवलं कायम

21:53 (IST)06 Dec 2019
अखेरीस लोकेश राहुल माघारी, भारताला दुसरा धक्का

पेरीच्या गोलंदाजीवर पोलार्डने घेतला राहुलचा झेल, भारताला दुसरा धक्का

लोकेश राहुलची ४० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ६२ धावांची खेळी

21:47 (IST)06 Dec 2019
लोकेश राहुलचं अर्धशतक, भारताचा डाव सावरला

विराटसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत दिलं भारताच्या डावाला स्थैर्य

21:36 (IST)06 Dec 2019
लोकेश राहुल - विराट कोहलीची महत्वपूर्ण भागीदारी

दुसऱ्या विकेटसाठी झालेल्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला

21:05 (IST)06 Dec 2019
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

पेरीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित सीमारेषेवर उभ्या असलेल्या हेटमायरकडे झेल देऊन माघारी

रोहितच्या अवघ्या ८ धावा

20:35 (IST)06 Dec 2019
वेस्ट इंडिजची २०७ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी २०८ धावांचं खडतर आव्हान, चहलला सामन्यात २ बळी

20:23 (IST)06 Dec 2019
कर्णधार पोलार्डही माघारी, चहलला आणखी एक बळी

चहलने उडवला पोलार्डचा त्रिफळा, विंडीजचा निम्मा संघ माघारी

20:22 (IST)06 Dec 2019
अखेरच्या षटकांमध्ये हेटमायर माघारी

युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर षटकार खेचताना सीमारेषेवर रोहितने पकडला झेल

हेटमायरच्या ४१ चेंडूत ५६ धावा, त्याच्या खेळीत २ चौकार आणि ४ षटकारांचाही समावेश

20:11 (IST)06 Dec 2019
शेमरॉन हेटमायरचं अर्धशतक, विंडीजचा डाव सावरला

भारतीय गोलंदाजांवर आक्रमक करत हेटमायरची फटकेबाजी, झळकावलं अर्धशतक

19:49 (IST)06 Dec 2019
जाडेजाने फोडली विंडीजची जोडी, किंग माघारी

जाडेजाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेटमायर यष्टीचीत

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का

19:48 (IST)06 Dec 2019
विंडीजचा आक्रमक खेळ सुरुच, ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

ब्रँडन किंग आणि शेमरॉन हेटमायर जोडीने फटकेबाजी सुरु ठेवत विंडीज संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला

19:31 (IST)06 Dec 2019
विंडीजची जमलेली जोडी फुटली, एविन लुईस माघारी

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेळताना लुईस पायचीत होऊन बाद

१७ चेंडूत लुईसच्या ४० धावा, खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश

19:27 (IST)06 Dec 2019
पहिला धक्का लागल्यानंतरही विंडीजच्या फलंदाजांचा आक्रमक खेळ

एविन लुईस आणि ब्रँडन किंग यांनी फटकेबाजी करत ५ षटकांत विंडीजला ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला आहे

19:09 (IST)06 Dec 2019
वेस्ट इंडिजला पहिला धक्का, सिमन्स माघारी

दिपक चहरच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हाती

अवघ्या २ धावा काढून सिमन्स माघारी परतला

19:04 (IST)06 Dec 2019
असा आहे वेस्ट इंडिजचा अंतिम संघ...
19:03 (IST)06 Dec 2019
असा आहे भारताचा अंतिम संघ....
18:39 (IST)06 Dec 2019
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

२०१९ वर्षातली शेवटची क्रिकेट मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज