मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या उमर अकमलसाठी त्याचा भाऊ आणि यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल पुढे आला आहे. उमर अकमलवरील दंड भरण्यासाठी कामरान अकमलने पुढाकार दर्शवला आहे, जेणेकरून उमर रिहॅबिलिटेशन कार्यक्रम सुरू करू शकेल. ३० वर्षीय उमरने २०२०च्या फेब्रुवारीपासून क्रिकेट खेळलेले नाही. पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) सामन्यात मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधल्याची माहिती न दिल्याबद्दल त्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) निलंबित केले.

हा खटला लुसाने येथील क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएसएस) दाखल झाला होता, तेथे उमरला १२ महिन्यांच्या निलंबनाच्या शिक्षेसह ४२.५ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड हप्त्यांमध्ये भरण्यासाठी उमरने विनंती केली होती, मात्र मंडळाने याला विरोध केला. संपूर्ण रक्कम जमा केल्याशिवाय भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परत येण्यासाठी आवश्यक असलेल्या रिहॅबिलिटेशन कार्यक्रमात तो सामील होऊ शकणार नाही, असे मंडळाने सांगितले.

कामरान म्हणाला, “मी माझ्या भावासाठी दंड भरण्यास तयार आहे. मी पीसीबीला विनंती करतो, की ही रक्कम पीएसएल सामन्यांसाठी मला मिळणाऱ्या रकमेतून कमी करता येईल. पैसा हा फार मोठा मुद्दा असू नये. उमर जेव्हा खेळू लागेल, तेव्हा ते पैसे आणि माझे मानधन पीसीबीकडूनच येईल. उमर दंड भरण्यास तयार आहे. पीसीबीने थोडी उदारता दाखवावी, अशी मी पीसीबीला विनंती करतो.”