02 June 2020

News Flash

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला वणव्याचा फटका!

धुराच्या साम्राज्यामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आगीमुळे ऑस्ट्रेलियाच्या अनेक शहरांमध्ये धुराचे साम्राज्य पसरले आहे.

सिडनी : ऑस्ट्रेलियातील वणव्याचे लोण पसरत चालले असून त्याचा फटका २० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला बसण्याची शक्यता आहे. धुराच्या साम्राज्यामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. खेळाडूंची सुरक्षितता आणि आरोग्य याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे आयोजकांकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील भागातील जंगलांमध्ये लागलेल्या या आगीमुळे सध्या मेलबर्नमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुके पसरले आहे. ‘‘परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात यावी,’’ असे एटीपी प्लेयर्स परिषदेचा अध्यक्ष असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने आयोजकांना सुचवले आहे. मात्र स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच खेळवण्यात येईल, असा विश्वास टेनिस ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष क्रेग तिले यांनी व्यक्त केला आहे.

‘‘आगीच्या धुरांचा फटका ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेला बसेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र तसे काहीही होणार नाही. हवामानतज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्णपणे निवळलेली असेल. त्यामुळे स्पर्धा लांबणीवर टाकण्यात कोणताच अर्थ नाही. स्पर्धेत कोणतीही आडकाठी येऊ नये, यासाठी आम्ही अतिरिक्त उपाययोजना करत आहोत. आगीचा कोणताही फटका मेलबर्नमधील जनतेला बसलेला नाही. हा वणवा मेलबर्नपासून बराच मैल लांब आहे. हवेचा दर्जा तपासण्यासाठीही आम्ही तज्ज्ञांची मदत घेत आहोत,’’ असे टिले यांनी सांगितले.

 

मारिया शारापोव्हाला थेट प्रवेश

पाच वेळा ग्रँडस्लॅम किताब पटकावणारी रशियाची मारिया शारापोव्हा हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी थेट प्रवेश (वाइल्ड कार्ड) देण्यात आला आहे. २०१९मध्ये झालेल्या दुखापतीनंतर शारापोव्हाची क्रमवारीत १४७व्या स्थानावर घसरण झाली आहे. मात्र टेनिस क्षेत्रातील एक बलाढय़ खेळाडू म्हणून तिला थेट प्रवेश देण्यात आला आहे. शारापोव्हा तब्बल १६व्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सहभागी होणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2020 2:24 am

Web Title: wildfires could cause problems for australian open zws 70
Next Stories
1 आनंद ५० व्या वर्षीही गुणवान बुद्धिबळपटू
2 विराटचे सूचक संकेत, म्हणाला ‘या’ खेळाडूला मिळू शकतं टी-२० विश्वचषकाचं तिकीट
3 ऋषभ पंत विराटच्या संघातलं Special Talent, खुद्द गांगुलीनेच केलं कौतुक
Just Now!
X