कारकीर्दीत यापूर्वी एकदा ऑलिम्पिक पदक मिळविले असले तरी अजूनही पदकाची आस संपलेली नाही. रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पध्रेत पुन्हा पदक मिळविण्याची माझी इच्छा आहे, असे भारताचा टेनिसपटू लिएण्डर पेस याने सांगितले. पुण्यातून विश्वविजेता खेळाडू घडावा अशीही इच्छा त्याने व्यक्त केली.
न्यूयॉर्कमध्ये यंदा झालेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत पेसने पुरुषांच्या दुहेरीत अजिंक्यपद मिळविले होते. त्यानंतर पुण्यात तो प्रथमच आला होता. अमानोरा पार्क येथील संभाव्य टेनिस केंद्राबाबत पाहणी करण्यासाठी तो येथे आला होता. ज्येष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक नंदन बाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पेस म्हणाला, ‘‘अटलांटा येथे १९९६ मध्ये मी ऑलिम्पिक कांस्यपदक मिळविले. हे पदक मिळविले असले तरी ऑलिम्पिक पदकाची भूक संपलेली नाही. आतापर्यंत सहा वेळा मी या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सातव्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेत विक्रम करण्याची माझी इच्छा आहे.’’
पेस हा गेली २३ वर्षे आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रात खेळत आहे. त्याच्या या तंदुरुस्तीचे रहस्य विचारले असता तो म्हणाला, ‘‘गेली अनेक वर्षे मला साथ देणारा सहाय्यकांचा चमू हा माझ्यासाठी कुटुंबासारखाच आहे. माझे वडील डॉ. वेस हे स्वत: तंदुरुस्ती तज्ज्ञ असल्यामुळे मला सतत त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. सराव तज्ज्ञ, योगातज्ज्ञ, मसाजिस्ट, आहारतज्ज्ञ आदीबाबत मी गेली २३ वर्षे बदल केलेला नाही. त्यामुळेच वेळोवेळी त्यांचे सविस्तर मार्गदर्शन मिळत असते. सर्वोत्तम तंत्रशुद्ध खेळ होण्यासाठी व खेळात शंभर टक्के अचूकता आणण्यासाठीच माझा सरावात भर असतो. जोपर्यंत खेळात अचूकता येत नाही, तोपर्यंत सराव थांबवायचा नाही हाच माझा दृष्टीकोन असतो. विजेता खेळाडू होण्यासाठी खेळावर निष्ठा पाहिजे, अफाट कष्ट करण्याची मानसिकता पाहिजे, पराभव पचविण्याची मानसिक ताकद पाहिजे.’’

सचिन, आनंदपासून प्रेरणा घ्यावी!
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विश्वनाथन आनंद यांनी देशाचे नाव उंचावले आहे. ते अजूनही पूर्वीसारखेच अव्वल यश मिळवित आहेत. त्यांचा आदर्श घेत अन्य नवोदित खेळाडूंनी आपली कारकीर्द घडवावी.