आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुर्वसंध्येला बीसीसीआयने आपल्या महिला व पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली. एकीकडे महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत तोडीस तोड कामगिरी करत असताना, वार्षिक करारांत बीसीसीआयने महिला खेळाडूंवर अन्याय केल्याचं दिसून येतंय. महिला क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयने यंदा C ही नवीन श्रेणी तयार केली असली तरीही पुरुष खेळाडूंच्या तुलनेत महिला खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांमध्ये बरीच मोठी तफावत असल्याचं स्पष्ट झालंय.

पुरुष खेळाडूंसाठी बीसीसीआयची गटवारी पुढीलप्रमाणे –

A+ – ७ कोटी
A – ५ कोटी
B – ३ कोटी
C – १ कोटी

महिला खेळाडूंसाठी बीसीसीआयची गटवारी पुढीलप्रमाणे –

A – ५० लाख
B – ३० लाख
C – १० लाख

अवश्य वाचा – क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयची नवीन आर्थिक करार यादी जाहीर

या गटवारीतून बीसीसीआय महिला क्रिकेटबद्दल किती गंभीर आहे हे समोर येतंय. पुरुष क्रिकेटपटूंच्या C गटातील खेळाडूंना मिळणाऱ्या वार्षिक कराराच्या अर्धी रक्कम महिला खेळाडूंच्या A गटातील खेळाडूंना मिळत आहे. मात्र गांभीर्याने विचार केल्यास महिला क्रिकेटपटूंबद्दलच्या या उदासीन धोरणाला बीसीसीआयसोबत भारतीय क्रीडा चाहतेही तितकेच जबाबदार असल्याचं आपल्याला दिसून येईल.

एक उदाहरण म्हणून २०१७ सालात इंग्लंड मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं उदाहरण घेऊया. साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. यानंतर भारतीय क्रीडा रसिकांचा मोठा रोष क्रिकेटपटूंना सहन करावा लागला. त्यातच तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादाने बीसीसीआयमधलं वातावरण पुरतं ढवळून निघालं. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे भारतीय क्रीडा रसिक मनापासून दुखावले गेले होते.

अशातच मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रीडा रसिकांना एक आशेचा किरण दिला. ज्या देशात भारतीय पुरुष क्रिकेट संघ अपमानास्पद पराभव स्विकारुन परतला होता, त्याच देशात मिताली राजच्या टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. स्मृती मंधाना, पुनम राऊत यांसारख्या मराठमोळ्या खेळाडूंनी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसारमाध्यमांनी आपला मोर्चा महिला संघाकडे वळवला. अपेक्षेप्रमाणे भारतीय महिलांनी चांगली कामगिरी करत, अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीत महिलांना पराभव पत्करावा लागला असला तरीही ज्या पद्धतीने मिताली राजचा संघ मैदानात खेळला ते पाहता प्रत्येक भारतीयांच्या ओठावर काही दिवस महिला संघाचं नाव पहायला मिळत होतं.

अवश्य वाचा – मोहम्मद शमीचे तरुणींसोबत अनैतिक संबंध असल्याचा पत्नीचा आरोप, बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला

मात्र ही बाब झाली विश्वचषकापुरती, इतर स्पर्धांच्या दरम्यान क्रीडा रसिक म्हणून आम्हाला महिलांचेही सामने बघायचे आहेत अशी मागणी भारतीय क्रीडा रसिक का करत नाहीत? महत्वाच्या स्पर्धा सोडल्या तर महिला क्रिकेट संघाच्या फार कमी सामन्याचं थेट प्रक्षेपण केलं जातं. यदाकदाचीत एखाद्या मालिकेचं थेट प्रेक्षपण करण्यात आलं तरीही त्याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा अगदीच नगण्य असतो. त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण अधिक सजग होणं गरजेचं आहे, हे भारतीय क्रीडा रसिक कधी ओळखणार हा देखील एक मोठा प्रश्नच आहे.

विश्वचषकात महिला संघाने पाकिस्तानवर मात केली. या सामन्याचं वृत्तांकन बहुतांश प्रसारमाध्यमांनी, पुरुष संघाच्या पराभवाचा बदला महिलांनी घेतला असं केलं. पण महिला संघाच्या कामगिरीचं विश्लेषण करताना नेहमी पुरुष संघाच्या कामगिरीची परिमाण लावणं कितपत योग्य आहे?? महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा एक स्वतंत्र विजय आहे. त्या कामगिरीचं मुल्यमापन करताना पुरुषांचा तराजू लावण्यात काय हाशील?? महिलांच्या कामगिरीचं मुल्यांकन होताना तराजू हा वेगळाच घ्यायला हवा. त्यामुळे आगामी काळात महिला क्रिकेटला आणखी उंच पातळीवर न्यायचं असेल बीसीसीआयसोबत तर क्रीडा रसिक म्हणून आपलीही तितकीच जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही.