दोहा : महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने नाटय़मय घडामोडीनंतर पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपलचेस प्रकारात अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले. जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक प्रकारातील अंतिम फेरी गाठणारा अविनाश हा भारताचा पहिला धावपटू ठरला आहे.

बीड जिल्ह्य़ातील मांडवा येथील २५ वर्षीय अविनाश याने पहिल्या फेरीत राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालूनही त्याला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. पण अविनाशच्या मार्गात अनेक धावपटूंनी अडथळा आणल्याबद्दल भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दाद मागितली होती.

अविनाशने तिसऱ्या हिटमध्ये ८ मिनिटे २५.२३ सेकंद अशी वेळ नोंदवून आपला ८.२८.९४ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. दोन वेळेला त्याच्या मार्गात प्रतिस्पर्धी खेळाडूंनी अडथळा आणला होता. त्यात अविनाशची कोणतीही चूक नव्हती. याबद्दल ‘एएफआय’ने आवाज उठवल्यानंतर शर्यत संयोजकांनी संपूर्ण शर्यतीचे चित्रण तपासून पाहिले. ‘एएफआय’ने मागितलेली दाद १६३.२ नियमानुसार ग्राह्य़ धरण्यात आल्यानंतर अविनाशची शुक्रवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

पहिल्या घटने वेळी चारपाच धावपटू एकमेकांवर पडले असताना अविनाशला त्यांच्यावरून उडी मारून जावे लागले. शर्यतीदरम्यान इथिओपियाचा टाकेले निगाटे याने अविनाशच्या मार्गात अडथळा आणला होता. अशा परिस्थितीतही अविनाशने सर्वोत्तम कामगिरी करत आपला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता.

भालाफेकमध्ये अन्नू राणी आठव्या स्थानी

अन्नू राणी हिला महिलांच्या भालाफेक प्रकारात अंतिम फेरीत ६१.१२ मीटर इतकी कामगिरी करता आल्याने तिला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सोमवारी ६२.४३ मीटर इतका भालाफेक करत अन्नूने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता, मात्र मंगळवारी रात्री रंगलेल्या अंतिम फेरीत तिला आठही प्रयत्नांत ६१.१२ मीटरच्या पुढे भाला फेकता आला नाही. नंतरच्या प्रयत्नांत तिने ६०.४० मीटर, ५८.४९ मीटर आणि ५७.९३ मीटर अशी कामगिरी नोंदवली. ‘‘काही तांत्रिक बाबतीत मी कमी पडत असून त्यावर मेहनत घेणार आहे. भविष्यात माझ्याकडून चांगली कामगिरी होईल, अशी आशा आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याकरिता मला या तांत्रिक मुद्दय़ांवर लवकरच मेहनत घ्यावी लागणार आहे,’’ असे अन्नूने सांगितले.