World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम आणि लोव्हलीना बोरगोहैन यांनी उपांत्य फेरी गाठल्यानंतर आता आणखी दोन बॉक्सरने भारताकडून पदक निश्चित केले आहे. ५७ किलो वजनी गटात भारताच्या सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर ४-१ असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. तर भारताच्या सिमरनजीत कौर हिने आयर्लंडच्या सारा ब्रॉडहर्स्ट हिला ३-१ असे पराभूत केले. या दोघींनी स्पर्धेत पदक निश्चित केल्यामुळे आता भारताला या स्पर्धेत चार पदके निश्चित झाली आहेत.

या आधी आजच्या दिवसात भारताच्या लोव्हलीना बोरगोहैन हिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट ५-० ने धुवा उडवत हा पराक्रम केला. तिने ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट हिला ६९ किलो वजनी गटात धूळ चारली.

त्याआधी मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या वू यु हिला ५-० असे पराभूत केले आणि पदक निश्चित केले होते.