नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सोनिया चहलचं पहिलं सुवर्णपदक मिळवण्याचं स्वप्न आज अपूर्णच राहिलं. 57 किलो वजनी गटात जर्मनीच्या ओर्नेला वानरने सोनियावर मात करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. याआधी झालेल्या सामन्यात मेरी कोमने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे सोनियाकडूनही भारताला सुवर्णपदकाची आशा होती, मात्र जर्मन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तिचा निभाव लागू शकला नाही.

संपूर्ण सामन्यात ओर्नेलाने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ओर्नेलाने आपल्या ठोश्यांनी सोनियाला पुरतं जेरीस आणलं. उपांत्य सामन्यात आक्रमक खेळ करणारी सोनिया ओर्नेलाच्या झंजावाताला उत्तर देऊ शकली नाही. तिसऱ्या फेरीत सोनियाने पुनरागमन करत सामन्यात थोडी रंगत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ओर्नेलाने सामन्यावरची आपली पकड मजबूत ठेवली होती. अखेर पंचांनी ओर्नेलाच्या पारड्यात आपलं मत टाकत तिला सामन्याचं विजेतेपद बहाल केलं.