२०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपलं स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघामध्ये आता चढाओढ लागली आहे. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं असून, भारताला उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. भारतासमोर अजुन इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंकेचं आव्हान असल्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चीत मानला जात आहे.

मात्र यजमान इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघासाठी उपांत्य फेरीचं गणित आता कठीण होऊन बसलेलं आहे. प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी चांगली कामगिरी आणि इतर सामन्यांचा निकाल या शक्यतेवर अवलंबून रहावं लागणार आहे.

१) इंग्लंडच्या संघासमोरचे निकष –

सलग सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला तरीही इंग्लंड अजुनही उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये आहे. ८ गुणांसह इंग्लंड सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडचे साखळी फेरीत दोन सामने शिल्लक आहेत. यापैकी पहिला सामना भारताविरुद्ध तर दुसरा न्यूझीलंडविरुद्ध असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकल्यास इंग्लंड उपांत्य फेरीत सहज प्रवेश करु शकेल.

मात्र या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात इंग्लंडला पराभव स्विकाराला लागला तर त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे. एक सामना गमावल्यास इंग्लंडच्या खात्यात १० गुण जमा होतील. बांगलादेशने पाकिस्तानला हरवल्यास आणि भारताकडून पराभव स्विकारल्यास इंग्लंडचा रस्ता साफ होणार आहे. याचसोबत श्रीलंकेचा संघ उरलेल्या दोन पैकी एक सामना हरल्यास इंग्लंड सर्वाधिक सामने जिंकणारा संघ या निकषावर पुढे जाऊ शकतो.

२) पाकिस्तानच्या संघासमोरचे निकष –

इंग्लंडचा संघ आपल्या उरलेल्या दोनपैकी एका सामन्यात हरल्यास पाकिस्तानसमोरचं आव्हान सोपं होईल. ९ गुणांसह पाकिस्तान सध्या चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून ११ गुणांसह पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतो.

मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यास पाकिस्तानसमोरचं आव्हान कठीण होऊन बसेल. बांगलादेशविरुद्ध सामना हरल्यास पाकिस्तानच्या संघाला कमी फरकाने पराभव स्विकारावा लागेल, कारण या सामन्यातली धावगती त्यांचं भविष्य ठरवणारी असणार आहे. याचसोबत इंग्लंडने आपले दोन्ही सामने गमावले आणि बांगलादेश व श्रीलंका आपल्या उर्वरित सामन्यांपैकी एक सामना हरले तर पाकिस्तान उपांत्य फेरीत जाऊ शकतो.

३) बांगलादेश संघासमोरचे निकष –

३ विजयांसह बांगलादेशचा संघ ७ गुणांनिशी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आपल्या उर्वरित सामन्यात भारत आणि पाकिस्तानवर मात केल्यास बांगलादेशचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करु शकतो. मात्र यासाठी बांगलादेशला इंग्लंडने किमान एक सामना हरावा अशी प्रार्थना करावी लागेल.

उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकल्यास बांगलादेशचं गणित थोडसं अवघड होऊन बसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका आपले उर्वरित दोन्ही सामने हरले आणि बांगलादेशने लॉर्ड्सवर पाकिस्तानला पराभूत केलं तर सरस धावगतीच्या आधारावर बांगलादेश उपांत्य फेरीत पोहचू शकतं.

४) श्रीलंकेच्या संघासमोरचे निकष –

उपांत्य फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला इतर संघाच्या कामगिरीवरच अवलंबून रहावं लागणार आहे. इंग्लंडने दोन्ही सामने गमावल्यास बांगलादेशने पाकिस्तानवर मात करुन भारताकडून पराभव स्विकारल्यास श्रीलंकेचा संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. मात्र सध्या प्रत्येक संघ करत असलेली सर्वोत्तम कामगिरी पाहता श्रीलंकेसमोरचं आव्हान हे खरच खडतर असणार आहे.