टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा ‘रन मशीन’ आहे. प्रत्येक सामन्यात तो भरपूर धावा करतो. जणू काही धावा करणे हा त्याचा दिनक्रम झाला आहे. पण असे असले तरी विराट एकटाच खेळून काय फायदा? तो एकटा संघाला विश्वचषक मिळवून देऊ शकत नाही. इतर खेळाडूंनीही त्याला योग्य ते सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. ३० मे रोजी विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. त्याआधी भारत २ सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जूनला आहे.

१९९६, १९९९ आणि २००३ या तीन विश्वचषक स्पर्धेत उतरण्याआधी जेवढे दडपण सचिनवर होते, तेवढे दडपण यावेळी कोहलीवर असणार आहे. तो दबाव कोहली पेलू शकेल का? असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला. त्यावेळी या विश्वचषकाच्या बाबतीत सचिन म्हणाला की प्रत्येक सामन्यात किमान दोन तरी खेळाडूंनी जबाबदारीने खेळ करायला हवा. केवळ एकटा माणूस विश्वचषकात फारसा प्रभाव पाडू शकत नाही. केवळ एक माणूस संपूर्ण स्पर्धेत खेळत राहिला तर स्पर्धा जिंकणे कठीण जाते. जोपर्यंत त्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला इतर खेळाडूंचे मैदानावर सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या खेळीचा फारसा फायदा होणार नाही. जर इतर खेळाडूंचे सहकार्य त्या एका खेळाडूला मिळाले नाही, तर हा विश्वचषक जिंकणे अशक्य आहे.

चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाबाबतही सचिनने मत व्यक्त केले. तो म्हणाला “टीम इंडियामध्ये अनेक प्रतिभावंत फलंदाज आहेत. त्यापैकी अनेक खेळाडू चौथ्या क्रमांकावर खेळायला उतरू शकतात. ४ हा केवळ क्रमांक आहे. त्याला त्यापेक्षा अधिक महत्व देण्यात अर्थ नाही. सामन्याची परिस्थिती पाहून फलंदाज मैदानावर पाठवता येऊ शकतो. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हा माझ्यासाठी अडचण नाही.”

“टीम इंडियातील खेळाडूंनी भरपूर क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या संघातील भूमिका माहिती आहेत. त्यामुळे फलंदाजीचा क्रमांक चौथा असो, सहावा असो किंवा आठवा असो, कोणी के खेळावे हे त्या त्या फलंदाजाला समजते. फक्त सामन्याच्या परिस्थितीची जाण असणे महत्वाचे आहे”, असे तो म्हणाला.