गेल्या काही महिन्यांपासून अडखळत असलेल्या भारतीय संघाला अखेर सराव सामन्यात सूर गवसला. पहिल्या सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभूत होणाऱ्या भारताला इंग्लिशचा पेपर सोडवताना जड गेले नाही. विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर २० धावांनी विजय साकारला.
पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे मानकरी असणारा भारतीय संघ यंदाच्या विश्वचषकातही जेतेपदाचा दावेदार समजला जात आहे. पहिल्या सराव सामन्यात हार पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र सर्वागीण कामगिरी करत इंग्लंडवर २० धावांनी विजय मिळवला. विश्वचषकात भारताची सलामी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी २१ मार्चला होणार आहे.
विजयासाठी १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ६ बाद १५८ धावा करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १७८ धावा केल्या. भारताने रोहित शर्मा (५), शिखर धवन (१४) व युवराज सिंग (१) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. त्या वेळी भारताची ३ बाद ३० अशी स्थिती होती. त्यानंतर विराट व रैना यांची जोडी झकास जमली. त्यांनी शैलीदार खेळ करत चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. त्यामुळेच भारताला आश्वासक धावसंख्या उभारता आली. कोहलीने आठ चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. रैनाने ५४ धावा करताना सहा चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद २१ धावांचे योगदान दिले.
इंग्लंडकडून मोठी भागीदारी झाली नाही. त्यामुळेच त्यांना १७९ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. त्यांच्याकडून मोईन अलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. त्यामध्ये त्याने चार चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. मायकेल लंबने ३६ धावांमध्ये सहा चौकार व एक षटकार अशी टोलेबाजी केली. शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांत जोस बटलर याने आक्रमक ३० धावा करीत संघाला विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तथापि हे प्रयत्न अपुरे ठरले. भारताकडून रवींद्र जडेजा याने २३ धावांमध्ये दोन बळी घेतले. आर. अश्विन, सुरेश रैना, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ४ बाद १७८ (विराट कोहली नाबाद ७४, सुरेश रैना ५४, टीम ब्रेसनन १/३१, जेड डर्नबॅच १/२७, ख्रिस जॉर्डन १/३७, रवी बोपारा १/२५) विजयी वि. इंग्लंड : २० षटकांत ६ बाद १५८ (मायकेल लंब ३६, जोस बटलर ३०, रवींद्र जडेजा २/२३, रवीचंद्रन अश्विन १/२०, सुरेश रैना १/२३, मोहम्मद शमी १/२९, भुवनेश्वर कुमार १/२७).