भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरु असणाऱ्या या स्पर्धेमध्ये प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीचा सामना जिंकला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १० गडी राखून मात करत मोठ्या थाटात अंतिम सामन्यायत प्रवेश निश्चित केला आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयामध्ये मुंबईकर यशस्वी जैस्वालने मोलाचे योगदान दिलं आहे. यशस्वीने ११३ चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. या खेळीसाठी यशस्वीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

डिसेंबर महिन्यामध्ये आयपीएलच्या लिलावत मोठी बोली लागल्याने यशस्वी चर्चेत आला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडे यशस्वीचीच चर्चा दिसत आहे. मात्र यशस्वी मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला आल्यापासून ते पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात शतक झळकवणारा केवळ चौथा भारतीय होण्यापर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता.

घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे एक दुकान, पण कुटुंबातील दोन मुले आणि पत्नीला सांभाळता येईल इतके त्यांचे उत्पन्न नव्हते अशा परिस्थितीतही आपल्याला क्रिकेटपटू व्हायचेय असं यशस्वीने लहानपणीच ठरवलं होतं. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशस्वीने भारतामध्ये क्रिकेटची पंढरी समजली जाणारी मुंबई गाठली. २०११ मध्ये मुंबईत आलेल्या यशस्वीला सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आझाद मैदानाबाहेर पाणीपुरी विक्रीचा व्यवसायही करावा लागला. परंतु २०१३ मध्ये प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी त्याच्यातील कौशल्य ओळखून त्याला पाठबळ दिले. ज्वाला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीने क्रिकेट कारकीर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. तेव्हापासूनच त्याने घेतलेली उत्तुंग भरारी पाहण्याजोगी आहे. मुंबईतील झोपडपट्टीत राहताना आयुष्यात कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटही खेळायला मिळेल की नाही, अशी शंका असताना या पठ्ठय़ाने केलेली कामगिरी स्वप्नवतच म्हणावी लागेल.

बांगलादेशमध्ये झालेल्या २०१८ च्या आशिया चषक युवा (१९ वर्षांखालील) स्पर्धेतही यशस्वीने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. यशस्वीने यंदाच्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत एक द्विशतक आणि दोन शतके झळकावत क्रिकेटविश्वाला त्याची दखल घेण्यास भाग पाडले. याशिवाय १७ वर्षांचा यशस्वी अ श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम यशस्वीने केला.

आयपीएलमध्ये कोटींची बोली

याच कामगिरीच्या जोरावर डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या लिलावामध्ये राजस्थान रॉयल्स संघाने २ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत यशस्वीला आपल्या संघात घेतले. त्यामुळे एकेकाळी क्रिकेटचे धडे घेत मुंबईमध्ये पाणीपुरी विकून दिवस ढकलणारा यशस्वी आता कोट्यधीश झाला आहे.

सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

या शतकी खेळीमुळे यशस्वी २०२० च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार खेळाडू ठरला आहे. मागील पाच डावांमध्ये यशस्वीने दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्याने या स्पर्धेमध्ये पाच सामन्यांमध्ये ५९, २९(नाबाद), ५७ (नाबाद), ६२ आणि १०५ (नाबाद) अशा एकूण ३१२ धावा केल्या आहेत.

आता अंतिम सामन्यामध्ये भारताची गाठ न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. या सामन्यातही यशस्वी काय कमाल करतो याकडे आता भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.