आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी सज्ज झालेला युवराज सिंग आपल्या लूकवरही विशेष मेहनत घेत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवराज पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघाकडून किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. प्रत्यक्ष मैदानावर प्रतिस्पर्धी संघाशी सामना खेळण्याआधी ३६ वर्षाच्या युवराजने लांब केसांबरोबरची त्याची लढाई संपवली. युवराजने हाकिम आलिमच्या सलूनमध्ये जाऊन आपले केस कापले. सेलिब्रिटींमध्ये हाकिम आलिमचे सलून लोकप्रिय आहे.

युवराजने त्याचा नव्या लूकचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. अखेर माझी माझ्या लांब केसांबरोबरची लढाई संपली. न्यू लूक धारण करण्याची ही वेळ आहे. मला माफ कर लोकेश राहुल, अभिनेता-मित्र अंगद बेदीने केस कापण्याची माझ्यावर जबरदस्ती केली असे युवराजने त्याच्या इन्स्टाग्राम संदेशात म्हटले आहे.

७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्य आयपीएलआधी हेअर स्टाईल चेंज करणार फक्त एकटा युवराज नाहीय. टीम इंडिया आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीनेही हाकिम आलिमच्या सूलनमध्ये जाऊन हेअर स्टाईल चेंज केली आहे.

काहीवर्षांपूर्वी आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू असलेल्या युवराजला यंदाच्या मोसमात प्रिती झिंटाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने बेस प्राईसला म्हणजे फक्त २ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. २००८ साली आयपीएलच्या पहिल्या मोसमात युवराजने किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले होते. त्यावेळी पंजाबचा संघ उपांत्यफेरीत पोहोचला होता.

तीन मोसम युवराज पंजाबकडून खेळला त्यानंतर त्याला २०११ साली पुणे वॉरियर्सने विकत घेतले. त्यानंतर तो आरसीबी आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला. २०१६ साली सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे जेतेपद मिळवले त्यावेळी युवराज त्या संघात होता. दोन मोसम हैदराबादकडून खेळल्यानंतर आता तो पुन्हा पंजाबकडून खेळणार आहे.