दोन आठवडय़ांचा विश्रांतीचा सल्ला
भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या सुरुवातीचे दोन आठवडे खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पायाच्या घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे युवराज सिंगला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत खेळता आले नव्हते. युवराजला दुखापतीतून सावरण्यासाठी किती वेळ लागेल अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र किमान दोन आठवडे तरी तो खेळू शकणार नाही. त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूची उणीव निश्चितच भासेल असे सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले. आतापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांचे प्रतिनिधित्व केलेला युवराज आता सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे. युवराजच्या अनुपस्थितीत आदित्य तरे, दीपक हुडा, तिरुमलसेट्टी सुमन, विजय शंकर यांच्यात अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर ही धडाकेबाज सलामीवीरांची जोडी सनरायझर्सला दमदार सलामी मिळवून देण्यासाठी सज्ज आहेत.