हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

स्केटिंग करताना दोन वेळा तोल जाऊनही युझुरू हनीयूने हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील फिगरस्केटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले. लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत विजेतेपद राखणारा गेल्या ६६ वर्षांतील पहिलाच खेळाडू आहे.

जपानचा खेळाडू हनीयूचा दोन वेळा तोल गेला होता. तथापि त्याने निराश न होता अप्रतिम कौशल्य दाखवत ३१७.८५ गुण मिळवले. त्याचा सहकारी शोमो उनोला रौप्यपदक मिळाले. स्पेनच्या जेव्हिअर फर्नान्डेझने कांस्यपदकाची कमाई केली. अमेरिकेच्या नाथन चेनने सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी घेतली होती. मात्र नंतरच्या टप्प्यात त्याला अपेक्षेइतके कौशल्य दाखवता आले नाही. त्यामुळे तो पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. अमेरिकेच्या दिक बटनने या प्रकारात १९४८ व १९५२ मध्ये अजिंक्यपद मिळवले होते. त्यानंतर विजेतेपद राखण्याची किमया हनीयूने केली.

महिलांच्या स्नोबोर्ड प्रकारात ईस्टर लिडेकाने सुवर्णपदक जिंकताना सनसनाटी कामगिरी केली. तिने गतवेळची विजेती अ‍ॅना व्हीथ (ऑस्ट्रिया) हिला पराभूत केले. टीना व्हेअररिदरला कांस्यपदक मिळाले. अमेरिकेच्या लिंडसे व्होनला सुवर्णपदकाची दावेदार मानण्यात आले होते; तथापि तिला सहावे स्थान मिळाले.