2 dead, over 500 arrested in France after PSG Champions League win : फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने अखेर UEFA चॅम्पियन्स लीग (UCL 2025) चे विजेतेपद जिंकले आहे. ३१ मे २०२५ रोजी म्युनिक येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा ५-० असा पराभव केला आणि पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. मात्र या ऐतिहासिक विजयाचा उत्सवादरम्यान फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला.
चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाच्या विजयानंतर चाहत्यांनी केलेल्या आनंदोत्सवात दोन जणांचा मृत्यू तर १९२ जण जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फ्रान्सच्या इंटेरियर मंत्रालयाने रविवारी याबद्दल माहिती दिली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिससह देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंसाचार उसळल्याच्या घटना घडल्या, यानंतर तोडफोड केल्याच्या आरोपाखाली रात्रीतून ४९१ लोकांना अटक करण्यात आली आहे.
२६४ वाहने जाळली
शेकडो ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या आगीच्या घटनांमध्ये २२ पोलीस अधिकारी आणि ७ फायरफायटर्स देखील जखमी झाले आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले. पीएसजीने त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग जिंकली असल्याने चाहत्यांचा आनंद शिगेला पोहचला, मात्र हा विजयाचा आनंद साजरा करताना फुटबॉल चाहत्यांनी २६४ वाहने जाळल्याचे देखील सांगितले जात आहे. यानंतर संपूर्ण फ्रान्समधून फटाके फोडणे आणि गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली एकूण ५५९ लोकांना अटक करण्यात आली आहे, तर ३०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन जणांचा मृत्यू
पॅरिसच्या मध्यवर्ती भागात स्कूटरवरून जात असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असे प्रॉसिक्युटर कार्यालयाने सांगितले. तर पॅरिसपासून सुमारे ७३० किमी अंतरावरील डॅक्स येथील एका १७ वर्षीय मुलाचा छातीत चाकूने वार करण्यात आल्याने मृत्यू झाला, असे वृत्त बीबीसीने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने दिले आहे.
पॅरिसच्या Champs-Élysées अव्हेन्यू आणि पीएसजीच्या Parc des Princes स्टेडीयमजवळ गोंधळ सुरू झाला आणि पोलिसांवर वस्तू फेकण्यात आल्या. यापैकी बहुतांश फॅन हे पीएसजीने ५-०च्या फरकाने इंटर मिलान क्लबला पराभूत केल्याचा आनंद साजरा करत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कारचे हॉर्न वाजवणे, घोषणा देणे आणि रस्त्यावर गाणे म्हणणे असे प्रकार करत होते.
विशेष म्हणजे सामन्यानंतर हिंसाचार भडकण्याच्या शक्यतेमुळे शहरात आधीच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती आणि Champs-Élysées तसेच पॅरिसच्या इतर प्रमुख भागांमध्ये आणि त्याच्या जवळच्या उपनगरांमध्ये ५,४०० पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते.