प्रतिष्ठेच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी पात्रता फेरीला सुरुवात झाली असून, सलामीच्या लढतीतच अल्बानिआने पोर्तुगालला नमवत खळबळजनक विजय मिळवला. विश्वविजेत्या जर्मनीने स्कॉटलंडवर मात केली तर पोलंडने जिब्राल्टरचा पराभव केला.

विश्वचषक स्पर्धेत प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या पोर्तुगालला या स्पर्धेद्वारे दमदार पुनरागमन करण्याची संधी आहे. मात्र सलामीच्या लढतीतच जागतिक क्रमवारीत ७१व्या स्थानी असणाऱ्या अल्बानिआने त्यांच्यावर १-० असा विजय मिळवला. बेकिम बलाज अल्बानिआच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोर्तुगालला प्रमुख खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची उणीव प्रकर्षांने जाणवली. मात्र तरीही नवख्या अल्बानिआकडून पराभूत होणे पोर्तुगालसाठी नामुष्काची गोष्ट आहे.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले मात्र बचाव उत्तम असल्याने त्यांना यश मिळाले नाही. ५२व्या मिनिटाला बेकिम बलाजने सुरेख गोल करत अल्बानिआचे खाते उघडले. अल्बानिआने घेतलेली आघाडी पोर्तुगालला भरून काढता आली नाही. उर्वरित वेळेत बचावात्मक खेळ करत अल्बानिआने दिमाखदार विजयाची नोंद केली.

पात्रता फेरीची सुरुवात आमच्यासाठी खराब झाली. आम्हाला कामगिरीत सुधारणा करावी लागेल असे पोर्तुगालचा खेळाडू नानी याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलमध्ये नुकत्याच प्रवेश करणाऱ्या जिब्राल्टरवर पोलंडने दणदणीत विजय मिळवला. रॉबर्ट लेवानडोवस्कीच्या चार गोलच्या जोरावर पोलंडने हा सामना ७-० असा जिंकला. काही दिवसांपूर्वी विश्वचषकाच्या फेरलढतीत अर्जेटिनाने जर्मनीवर विजय मिळवला होता. मात्र या पराभवातून सावरत जर्मनीने पात्रता फेरीत स्कॉटलंडचा २-१ असा पराभव केला. थॉमस म्युलरने दोन गोलांसह या विजयाच निर्णायक भूमिका बजावली. स्कॉटलंडतर्फे इकेची अन्याने एकमेव गोल केला.