सिडनी : अनुभवी ऑॅफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियातील प्रचलित ट्वेन्टी-२० स्पर्धा ‘बिग बॅश लीग’च्या आगामी हंगामात सिडनी थंडर संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत खेळणारा तो भारताचा सर्वांत नामांकित क्रिकेटपटू ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ‘आयपीएल’मधून निवृत्ती घेतल्यानंतर ३९ वर्षीय अश्विनने सिडनी थंडरकडून खेळण्यास होकार दिल्याचे समजते. फ्रँचायझी याबाबतची घोषणा या आठवड्याच्या अखेरीस करणार असल्याचे समजते.
अश्विनने संयुक्त अरब अमिरातीतील ‘आयएलटी-२०’ स्पर्धेच्या खेळाडू लिलावासाठीही आपले नाव नोंदवले आहे. या लीगची ४ जानेवारीला सांगता होणार असून त्यानंतर तो ऑस्ट्रेलियातील स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. ‘बिग बॅश लीग’चे आयोजन १४ डिसेंबर ते १८ जानेवारीदरम्यान केले जाणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टॉड ग्रीनबर्ग यांनी याच महिन्यात अश्विनशी संपर्क साधताना बिग बॅश लीगमधील सहभागाबाबत चर्चा केली होती. अश्विनने गेल्या महिन्यात ‘आयपीएल’ मधून निवृत्ती जाहीर केली. एखादा भारतीय खेळाडू जोपर्यंत देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय आणि ‘आयपीएल’ सामने खेळत असेल, तोपर्यंत तो परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’चे धोरण आहे. परंतु अश्विन भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने तो अन्य देशांतील लीगमध्ये खेळू शकेल.
अश्विनने बिग बॅश लीगच्या परदेशी खेळाडूंच्या यादीत नोंदणी केली नाही. तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला विशेष परवानगी देऊ शकते. अश्विनने भारताकडून खेळताना ५३७ कसोटी बळी मिळवले आहेत. ‘आयपीएल’मध्ये २२१ सामन्यांत त्याच्या नावे १८७ बळी आहेत.