नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सरकारने कठोर निवड निकष जाहीर केले असून, पदक जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या खेळाडूंनाच स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या अतिरिक्त सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

क्रीडा मंत्रालयाने बुधवारी आपल्या संकेतस्थळावर आशियाई क्रीडा स्पर्धेचे निवड निकष प्रसिद्ध केले. या पाच पानी पत्रकात आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या खेळाडूंनाच प्राधान्य दिले जाईल, तसेच आशियाई स्तरावर वैयक्तिक खेळात पहिल्या सहामध्ये आणि सांघिक खेळात पहिल्या आठमध्ये असलेल्या खेळाडू आणि खेळांना नामांकनासाठी पात्र धरण्यात येईल, खेळाडूला स्वखर्चाने अतिरिक्त सहाय्यक प्रशिक्षक नेण्यास मान्यता नसेल, अशा प्रमुख आणि कठोर निकषांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या नागोया येथे होणार आहे.

याआधी बहुविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी संघ किंवा खेळाडू निवड प्रक्रियेवर कायमच टीका झाली आहे. हे प्रसंग वारंवार येऊ नयेत यासाठीच क्रीडा मंत्रालयाने निवड प्रक्रिया अधिक कडक केली आहे.

एखादा खेळाडू किंवा संघांचे उद्दिष्ट पदक जिंकण्याचे नसून, केवळ सहभागाचे असल्याचे मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) निदर्शनास आल्यास अशा खेळाडू किंवा संघास मंजुरी मिळणार नाही, असेही या पत्रकात म्हणण्यात आले आहे.

ऑलिम्पिक आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडू किंवा संघाचा सहभाग हा आंतरराष्ट्रीय महासंघांनी निश्चित केलेल्या पात्रता निकषानुसार केला जातो. अशा स्पर्धा या नव्या क्रीडा धोरणातून वगळण्यात आल्या आहेत.

क्रीडा मंत्रालयाने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ पाठविण्याकरिता एक धोरणही निश्चित केले आहे. ज्या खेळांच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धा उरकल्या जात आहेत किंवा त्यांचा दर्जा कमी आहे आणि प्रमुख देश सहभागी होणार नसतील, अशा स्पर्धेत भारतीय संघास मान्यता मिळणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

निवड निकष कोणत्या स्पर्धांसाठी?

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (२०२५-२६), पॅरा आशियाई, आशियाई इनडोअर, आशियाई बीच स्पर्धा, युवा ऑलिम्पिक, आशियाई युवा आणि राष्ट्रकुल युवा स्पर्धा. (या स्पर्धांसाठी अखेरच्या १२ महिन्यांतील कामगिरी लक्षात घेतली जाईल.)

कोणाची निवड?

– सांघिक खेळात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहापेक्षा कमी संघ असतील, तर अशा स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या दोनमध्ये येणे आवश्यक. त्या संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत संधी मिळणार.

– आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ६ ते १२ संघ असतील, तर भारतीय संघ पहिल्या चारमध्ये येणे आवश्यक.

– ज्या खेळांच्या आशियाई स्पर्धा द्वैवार्षिक पद्धतीने होतात आणि गेल्या वर्षभरात कोणतीच स्पर्धा झाली नसेल, तर मागील दोन वर्षांच्या कालावधीतील सर्वात अलीकडच्या स्पर्धेतील कामगिरीचा विचार करणार.

– अखेरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर दोन वर्षांत झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी विचारात घेतली जाणार नाही.

– वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळाडू आशियाई क्रमवारीत किंवा नजीकच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या सहांत असणे आवश्यक.

निकषाचा फटका कोणाला?

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी या कठोर निकषांचा फटका फार कमी खेळांना बसणार आहे. भारताने अखेरच्या २०२३ हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करताना २८ सुवर्णपदकांसह १०६ पदके जिंकली होती. या वेळी फक्त फुटबॉल खेळाचा समावेश अवघड आहे. कारण सध्या ‘फिफा’ क्रमवारीत आशियाई संघांत भारत २४व्या स्थानावर आहे.