लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) यंदाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची रंगत उत्कंठा वाढवणारी होती. मतदान कक्षाबाहेर उमेदवारांचा, निवडक कार्यकर्त्यांचा वावर हा कोणत्याही निवडणुकीसारखाच होता. पण, निवडणुकीतील चुरस वाढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसुद्धा मतदान कक्षाबाहेर मतदारांच्या स्वागताला उभे होते. मुंबई क्रिकेटचे भवितव्य ठरवणारा एकदिवसाचा मतदारराजा मोठय़ा उत्साहाने मतदानासाठी वानखेडे स्टेडियमपर्यंत आला. सव्वासहा या एमसीएच्या प्रमाणवेळेपर्यंत ३२१ मतदारांनी आपला हक्क बजावला होता.
प्रसारमाध्यमांच्या गर्दीला न्याय देत राजकीय नेत्यांनी फक्त मतदानच केले नाही, तर आपली मतेही मांडली. यात रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्या स्वाभाविक ‘मत’प्रदर्शनाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. दुपारी तीन वाजता एमसीएच्या मतदानाला प्रारंभ झाला आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम मतदार म्हणून आपला कौल दिला. गावाला जायचे असल्यामुळे लवकर आल्याचे कारण त्यांनी सांगितले. याशिवाय मुंबईच्या क्रिकेटचा स्तर परत आणण्याची गरज आहे. विद्यापीठ क्रिकेटला अधिक चालना द्यायला हवी, असे मत चव्हाण यांनी मांडले. त्यानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, नितीन सरदेसाई, सचिन अहिर, प्रसाद लाड, आदी राजकीय नेत्यांनी इमानेइतबारे मतदान केले. ७४ वर्षीय पवार मात्र दिलीप वेंगसरकर आणि आशीष शेलार यांच्यासह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान कक्षाबाहेर उभे होते.
प्रतिस्पर्धी ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाचे विजय पाटीलसुद्धा आपल्या ‘सेने’सह द्वारापाशी ठाण मांडून उभे होते. आठवले यांनी मतदान केल्यानंतर उत्साहाने प्रसारमाध्यमांकडे सांगितले, ‘‘पवारांची भेट घेतली होती. त्यांनी एमसीए थोडी समजून घ्या आणि मग पुढे निवडणुकीला लढा असे, सांगितल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला.’’ मागील निवडणुकीच्या वेळी विजय पाटील यांच्या ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाने जोरदार ‘फील्डिंग’ लावली होती. पांढऱ्या शर्टात, गटाचा लोगो लावलेले जवळपास शंभर कार्यकर्ते मतदार कक्षाबाहेर उपस्थित होते. मात्र यंदा दोन्ही गटांच्या झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रत्येकी फक्त दहा प्रतिनिधी मतदान कक्षाबाहेरील आवारात दिसत होते.
कडेकोट बंदोबस्तामुळे वानखेडेच्या आवारातील वातावरणात चिंतेचे ढग दाटले होते. काही उमेदवार विजयी मुद्रेने वावरत होते, तर काहींच्या चेहऱ्यावर पराभवाचे भय स्पष्ट दिसत होते. मुंबई क्रिकेटचे प्रशासन कुणी चालवावे? राजकीय नेत्यांनी, प्रशासकांनी की माजी क्रिकेटपटूंनी ही चर्चा गेले काही दिवस रंगत होती. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र बुधवारी मतदानाच्या दिवशी ‘अवघा रंग एकची झाला’ हेच चित्र मात्र दिसत होते. एमसीएच्या ३२९ मतदारांपैकी तीन मतदारांना सदस्यत्व शुल्क न भरल्यामुळे मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला होता. याशिवाय नारायण राणे अमेरिकेला गेले असल्यामुळे मतदानाला हजेरी लावू शकले नाहीत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2015 रोजी प्रकाशित
अवघा रंग एकची झाला!
लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) यंदाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची रंगत उत्कंठा वाढवणारी होती.

First published on: 18-06-2015 at 02:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 321 voters used voting right in mca election