धावांचा महापूर असं वर्णन होईल अशा अविश्वसनीय लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रत्येक फटक्यागणित नवनवे विक्रम प्रस्थापित झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने ४१२ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाने या डोंगरासमोर दबून न जाता वादळी फटकेबाजी केली. स्मृती मान्धनाने अवघ्या ५० चेंडूतच शतक साजरं केलं. हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांनी विजयासाठी पुरेपुर प्रयत्न केले. एकाक्षणी चेंडू आणि धावांचं समीकरण सारखंच होतं. मात्र दिप्ती बाद झाली आणि भारतीय संघापासून विजय दुरावला. भारताचा डाव ३६९ धावांत आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. शतकवीर बेथ मूनीला सामनावीर तर स्मृती मान्धनाला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

या लढतीच्या निमित्ताने भारताने पहिल्यांदाच धावांचा पाठलाग करताना तीनशेचा टप्पा ओलांडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कोणत्याही संघाने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. महिला वनडे क्रिकेटमधली धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.दोन्ही संघांनी मिळून ७८१ धावा चोपल्या. महिला वनडे क्रिकेटमधला हा नवीन विक्रम आहे.

स्मृतीने १४ चौकार आणि ४ षटकारांसह विक्रमी शतक झळकावलं. स्मृतीचं वनडेतलं हे १३वं शतक आहे. महिला क्रिकेटमध्ये वनडे प्रकारातलं हे दुसरं वेगवान शतक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने ४५ चेंडूत शतक झळकावलं होतं. भारतीय महिला क्रिकेटपटूने झळकावलेलं हे सगळ्यात वेगवान शतक आहे.काही दिवसांपूर्वी याच मालिकेतल्या मुल्लापूर इथे झालेल्या दुसऱ्या वनडेत स्मृतीने ११७ धावांची शतकी खेळी केली होती. तोच फॉर्म कायम राखत स्मृतीने आणखी एका खणखणीत शतक झळकावलं. स्मृतीने १७ चौकार आणि ५ षटकारांसह १२५ धावांची खेळी केली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूत ५२ तर दीप्ती शर्माने ५८ चेंडूत ७२ धावांची तडाखेबंद खेळी केली. स्नेह राणाने ३५ धावा करत दीप्तीला साथ दिली पण दिप्ती बाद होताच भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. ऑस्ट्रेलियातर्फे किम गॅरथने ३ तर मेगन शूटने २ विकेट्स घेतल्या.

दिल्लीतल्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४१२ धावांची मजल मारली. बेथ मूनीने २३ चौकार आणि एका षटकारासह ७५ चेंडूत १३८ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. जॉर्जिया वॉलने ८१ तर एलिसा पेरीने ६८ धावांची खेळी करत बेथला चांगली साथ दिली. भारतातर्फे अरुंधती रेड्डीने ३ तर रेणुका सिंग आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.