India vs England 5th Test: ओव्हलच्या मैदानावरील विजय हा भारतीय संघासाठी अतिशय खास ठरला आहे. या सामन्याआधी भारतीय संघ मालिकेत २-१ ने पिछाडीवर होता. त्यामुळे मालिका बरोबरीत आणायची असेल, तर हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडने हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण, मोहम्मद सिराज इंग्लंडसमोर खंबीर उभा राहिला. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ असे दोन्ही डावात मिळून त्याने ९ गडी बाद केले. इंग्लंडला जेव्हा विजयासाठी ७ धावांची गरज होती, त्यावेळी सिराजने भन्नाट यॉर्कर चेंडू टाकून गस एटकिंसनला त्रिफळाचित केलं आणि भारतीय संघाचा विजय पक्का केला. दरम्यान या सामन्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि भारतीय संघ व्यावस्थापकांनी मन जिंकणारी कृती केली.

शुबमन गिलची मन जिंकणारी कृती

सामना जिंकल्यानंतर संघाचा कर्णधार पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पत्रकार परिषदेत हजेरी लावत असतो. पण भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार गिलने मन जिंकणारी कृती केली आहे. गिलने मोहम्मद सिराजलाही पत्रकार परिषदेत सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केलं. गिलने केलेल्या या कृत्याचं सर्वांकडुन कौतुक केलं जात आहे. या सामन्यात सिराजने गोलंदाजीत अतिशय महत्वाची भूमिका बजावली. ज्यावेळी सामना पूर्णपणे हातातून निसटला होता. त्यावेळी सिराजने पूर्ण ताकदीने गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडल. यासह हा सामना भारतीय संघाला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

सिराजची गोलंदाजी ठरली भारतासाठी टर्निंग पाँईंट

या सामन्यातील चौथ्या दिवशी असं वाटलं होतं की, भारतीय संघ हा सामना गमावणार आणि इंग्लंड मालिकेवर ३-१ ने कब्जा करणार. हॅरी ब्रुक १९ धावांवर फलंदाजी करत असताना सिराजने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याचा झेल सोडला. त्यानंतर ब्रुकने शतक झळकावलं. हा इंग्लंडच्या दृष्टीने सर्वात मोठा टर्निंग पाँईंट होता. पण ब्रुक बाद झाल्यानंतर सामन्याचं पारडं थोडं का होईना पण भारतीय संघाच्या बाजूने झुकलं. मग जो रूटला बाद करून भारताने सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली. हे सर्व करण्यात सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांवर टाकलेला दबाव कामी आला. सिराज ज्या वेगाने गोलंदाजी करत होता, त्यावर इंग्लंडचे फलंदाज मोठे फटके खेळणं सोडून स्वत:ला बाद होण्यापासून वाचवताना दिसून आले. याचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला.

पाचव्या दिवशी काय घडलं?

या सामन्यातील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला, त्यावेळी इंग्लंडचा संघ विजयापासून केवळ ३५ धावा दूर होता. म्हणजे इंग्लंडचा विजय जवळजवळ निश्चित होता. पण सिराजच्या मनात वेगळच सुरू होतं. एका बाजूने प्रसिध कृष्णा आणि दुसऱ्या बाजूने सिराज, दोघेही आगीचे गोळे फेकत होते. पहिल्याच सत्रात सिराज आणि प्रसिधने मिळून ४ गडी बाद केले आणि भारतीय संघाला हा सामना ६ धावांनी जिंकून दिला.