सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन एकदिवसीय सामान्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना काल म्हणजेच १७ नोव्हेंबरला अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळाला गेला. या सामन्यादरम्यान एक अतिशय रंजक घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलाने क्रिकेटपटू डेविड वॉर्नरकडे त्याच्या एक वस्तूची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की प्रेक्षकांमध्ये बसलेला एक मुलगा हातामध्ये एक कागद घेऊन बसला आहे. त्याने या कागदावर लिहिलंय, “डेविड वॉर्नर मला तुमचे टीशर्ट मिळू शकेल का?” सामन्यादरम्यान या मुलाला टीव्हीवर दाखवण्यात आले. या मुलासह वॉर्नरलाही स्क्रीनवर दाखवण्यात येत होते. वॉर्नरने सुरुवातीला या गोष्टीकडे लक्ष दिले नव्हते. मात्र वॉर्नरच्या शेजारी बसलेल्या मार्नस लबुशेनने वॉर्नरला त्या मुलाला टीशर्ट देण्यास सांगितले. मात्र यानंतर वॉर्नरने दिलेली भन्नाट प्रतिक्रिया सध्या व्हायरल झाली आहे.
काहीवेळाने वॉर्नरने या मुलाच्या मागणीवर उत्तर दिले. यावेळी वॉर्नरही आपल्या हातामध्ये एक कागद घेऊन बसलेला दिसला. या कागदावर त्याने लिहिलंय, “मार्नसकडून एक टीशर्ट घे.” वॉर्नरच्या या सल्ल्यावर मुलाने पुन्हा एकदा एका कागदावर नवा संदेश लिहिला. मात्र यावेळी त्याने मार्नससाठी हा संदेश लिहिला आहे. मुलालने लिहिलंय, “मार्नस मला तुझे टीशर्ट मिळेल का?” मुलाच्या या मागणीनंतर मार्नस आणि वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये हसू लागतात. यानंतर वॉर्नर त्या मुलाला सामना संपल्यावर त्याच्याकडे येण्याचा इशारा करतो. या व्हिडीओला साडे तीन लाखांहुनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, टी२० विश्वचषकात थंडावलेला डेविड वॉर्नर या सामन्यांमध्ये धमाकेदार खेळी खेळताना दिसत आहे. कालच्या सामन्यात सलामीला येताना त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने ८४ चेंडूत ८६ धावांची खेळी झाली.
