पीटीआय, नवी दिल्ली
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान संघाच्या सामन्यासाठी नियोजित कार्यक्रमात घटस्थापनेचा म्हणजेच १५ ऑक्टोबरचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र, नवरात्री उत्सावाची सुरुवात याच दिवशी होत असल्यामुळे अहमदाबाद येथे या दिवशी प्रचंड उत्साह असतो आणि आता या सामन्यात हाच उत्साह अडचण निर्माण करतो आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने हा सामना एक दिवस अलीकडे म्हणजे १४ ऑक्टोबरला खेळविण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवला आहे.
गुजरात पोलिसांनी या दिवशी पूर्ण क्षमतेने पोलीस सुरक्षाव्यवस्था पुरविण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) असमर्थता दर्शवली आहे. विशेष म्हणजे आयसीसीने या सामन्यासाठी १५ ऑक्टोबर दिवस निश्चित केल्यानंतर तातडीने गुजरातमधील हॉटेल आणि विमानसेवा पुरविणाऱ्या विमान कंपन्यांचे दर गगनाला भिडले होते. सामन्यापूर्वी या आर्थिक उलाढालीच्या चर्चेनेही कळस गाठला आहे.
एकूणच दोन देशांतील परस्पर संबंध आणि सामन्याचे महत्त्व लक्षात घेता सामन्याचा दिवस बदलावा लागेल असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. यासाठी ‘आयसीसी’ आणि ‘बीसीसीआय’ला एकत्र बसून विचार करावा लागणार आहे. सामना अहमदाबाद येथून हलवला जाणार नाही हे निश्चित असले, तरी क्रिकेट चाहत्यांना आपल्या प्रवासाच्या तारखेत बदल करावा लागणार हे निश्चित आहे.
‘बीसीसीआय’ने विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी २७ जुलैला बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत उपस्थित सर्व राज्य संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर भारत-पाकिस्तान सामन्याच्या बदलत्या तारखेविषयीदेखील चर्चा अपेक्षित आहे. मुळात विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात उशीर झाला होता. आता पुन्हा या सामन्याचा दिवस बदलायचा झाल्यास, वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. कदाचित यामुळेच ‘बीसीसीआय’ने अद्याप तिकीट विक्रीला देखील सुरुवात केलेली नाही.
दिवस बदलण्यातील अडचणी काय ?
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबरला इंग्लंड वि. अफगाणिस्तान (दिल्ली) आणि न्यूझीलंड वि. बांगलादेश (चेन्नई) असे दोन सामने होणार आहेत. एकाच दिवशी तीन सामन्यांचे प्रयोजन कुठल्याच दिवशी करण्यात आलेले नाही. मात्र, सहा दिवस दोन सामने होणार आहेत. पाकिस्तान १२ ऑक्टोबरला श्रीलंकेशी खेळणार आहे. भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला आणल्यास पाकिस्तानचा सगळा वेळ प्रवासात जाणार आहे. त्यांना सरावासाठी वेळच मिळणार नाही. भारताला मात्र, दोन दिवस आराम मिळेल.