Ab De Villiers Century: दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिविलियर्स हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखळा जातो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. मात्र, त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता अजूनही कमी झालेली नाही. सध्या तो वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धेत दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाचं नेतृत्व करत आहे. या संघाकडून फलंदाजी करताना त्याने इंग्लंड चॅम्पियन्सकडून खेळताना दमदार शतकी खेळी केली आहे. त्याने इंग्लंड चॅम्पियन्स संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यासह आपल्या संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड चॅम्पियन्स संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १५२ धावा केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५३ धावा करायच्या होत्या. हे आव्हान दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाने १२.२ षटकात पूर्ण केले. यासह हा सामना १० गडी राखून आपल्या नावावर केला. सलग ३ सामने जिंकून दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघ ६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

एबी डिविलियर्सचं दमदार शतक

या सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाकडून एबी डिविलियर्सने दमदार शतक झळकावलं. त्याने २० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर ४१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने ७ षटकार आणि १५ चौकार मारले. या डावात त्याने ११६ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स संघाकडून हाशिम आम्ला आणि एवी डिविलियर्सची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून दिलेलं आव्हान पूर्ण केलं. आम्लाने २५ चेंडूंचा सामना करत ४ चौकारांच्या साहाय्याने २९ धावांची खेळी केली.

इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. इंग्लंड चॅम्पियन्स संघाकडून ओएन मॉर्गनने २० धावांची खेळी केली. इंग्लंडकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या मस्टर्सने ३९ धावांची खेळी केली. तर रवी बोपाराने ७, मोईन अलीने १०, समित पटेलने २४ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना पार्नेल आणि इमरान ताहीरने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.