AB De Villiers On Asia Cup Trophy Controversy: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं. पण सामना झाल्यानंतर विजेत्या भारतीय खेळाडूला ट्रॉफी दिली गेली नव्हती. आशिया चषक २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना होऊन ४ दिवस उलटले आहेत, पण अजूनपर्यंत आशिया चषकाची ट्रॉफी भारतीय संघाकडे सुपूर्द करण्यात आलेली नाही. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आशिया चषकाची ट्रॉफी देण्यास नकार दिला होता. या वादावर आता दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाने जर आशिया चषकाची ट्रॉफी जिंकली, तर भारतीय संघ मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाही हे आधीच म्हटलं गेलं होतं. अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. इतर सर्व पुरस्कार दिले गेले, पण जेतेपदाची ट्रॉफी दिली गेली नव्हती. मोहसीन नक्वी ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर वाट पाहत होते. पण भारतीय खेळाडू स्टेजवर गेलेच नाही. त्यामुळे मोहसीन नक्वी ट्रॉफी आणि मेडल घेऊन निघून गेले. बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार करणार असल्याची भूमिका घेतली आहे. पण अद्यापही मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी बीसीसीआयच्या हाती सोपवलेली नाही. दरम्यान क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवाव्या अशी वक्तव्य एबी डिविलियर्सने केलं आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना एबी डिविलियर्सने म्हणाला, अशा गोष्टी, अशा घटना घडल्यामुळे खेळाडूंमधून खेळभावना निघून जाते. यासह त्याने भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीचं कौतुक देखील केलं.एबी डिविलियर्स म्हणाला, “ट्रॉफी कोणाच्या हस्ते दिली जात आहे, यावर भारतीय खेळाडू नाराज होते. पण मला वाटतं की खेळ हा खेळच राहू द्या, त्यात राजकारण आणू नका. हे खूपच दुखद होतं.”

मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचं स्पष्ट मत आहे की, आशिया चषक विजेत्याची ट्रॉफी ही अध्यक्ष्यांच्या हस्तेच दिली जावी. बराच वेळ स्टेजवर वाट पाहूनही भारतीय खेळाडू ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर आले नव्हते. त्यामुळे ते ट्रॉफी आणि मेडल घेऊन निघून गेले. एसीसीच्या बैठकीत राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांनी घटनेचा कडाडून विरोध केला. बीसीसीआयने दबाव टाकल्यानंतर मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली असल्याची माहिती समोर येत आहे.