IPL 2026 Updates: आयपीएल २०२६ चा नवा हंगामापूर्वी संघांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. नवा हंगाम अवघ्या काही महिन्यांतच सुरू होणार आहे, यापूर्वी संघांनी नव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात केली आहे. आयपीएल २०२६ पूर्वीचा लिलाव डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्ये रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सर्व संघांना सादर करायची आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.
रोहित शर्माच्या खास मित्राला आयपीएल संघांच्या हेड कोचची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माने नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केली. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत सर्वाधिक धावा करत मालिकावीर ठरला आणि अखेरच्या वनडेत त्याने शतकी खेळी केली. रोहितचा सराव आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन यामागे रोहितच्या या मित्राचा सर्वात मोठा वाटा आहे आणि त्याच्या खांद्यावर सर्वात मोठी जबाबदारी आली.
रोहित शर्माचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर हा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा नवे मुख्य प्रशिक्षक असणार आहे. यापूर्वी चंद्रकांत पंडित यांनी ही भूमिका सांभाळली होती. अभिषेक नायर यापूर्वी केकेआर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक भूमिकेत होता. यापूर्वी अभिषेक नायर हे महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक होता.
अभिषेक नायर केकेआरचा हेड कोच
इंडियन एक्सप्रेसने अभिषेक नायर हेड कोच होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी दिली होती. आता केकेआरने जाहीर करत या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. क्रिकइन्फोच्या एका वृत्तानुसार, तीन वर्षे संघाबरोबर असलेले चंद्रकांत पंडित आता संघापासून वेगळे झाले आहेत. पंडित यांच्या कार्यकाळात केकेआरने २०२४ मध्ये आयपीएलचे विजेतेपदही जिंकले होते.
केकेआर संघाने जवळजवळ दहा वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली, परंतु मागील हंगाम संघासाठी फारसा चांगला ठरला नाही. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता.
भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय सामने खेळलेल्या अभिषेक नायरने यापूर्वी अनेक संघांना प्रशिक्षण दिले आहे. तो यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सशी कोणत्या ना कोणत्या भूमिकेत जोडला गेला आहे. त्याने काही काळ टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं होतं, परंतु अचानक त्यांना हे पद सोडावं लागलं. आता अभिषेक नायर केकेआर संघाची पुनर्बांधणी करण्याचं मोठं काम करणार आहे.
