What If Abhishek Sharma Fails In Final Of Asia Cup Against Pakistan: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा अपयशी ठरला तरी भारताला घाबरण्याचे कारण नाही, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. अभिषेक सध्या आशिया चषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने सुपर ४ मध्ये सलग तीन अर्धशतके झळकावली आहेत. याचबरोबर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानी आहे.
अभिषेक शर्माने आशिया चषकातील सहा सामन्यांमध्ये ५१.५० च्या सरासरीने आणि २०४.६३ च्या स्ट्राईक-रेटने ३०९ धावा केल्या आहेत. स्पर्धेदरम्यान, अभिषेक बाद झाल्यानंतर भारतीय डाव अनेकदा मंदावला आहे, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि इतर खेळाडूंना दुबईमध्ये लय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशात पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला आहे की, जर अभिषेक डावाच्या सुरुवातीलाच बाद झाला तर भारत अडचणीत येऊ शकतो.
पण, सुनील गावसकर यांना असे वाटते की, शोएब अख्तर म्हणत आहे तसे काहीही होणार नाही. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर इंडिया टुडेशी बोलताना, सुनील गावरकर यांनी सांगितले की, संघात असे अनेक खेळाडू आहेत जे सामन्याचा निर्णय बदलू शकतात. गावसकर यांना वाटते की, सूर्यकुमारला तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांच्यासोबत धावा कराव्या लागतील.
सुनील गावसकर यांना असेही वाटते की, आशिया चषकातील प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात करणारा शुभमन गिल देखील मोठ्या खेळी करण्यासाठी सज्ज आहे.
गावसकर म्हणाले की, “आपल्याकडे असे अनेक महत्त्वाचे खेळाडू आहेत जे एकट्याच्या जोरावर सामन्याचा निर्णय बदलू शकतात. सूर्यकुमार यादवला धावा काढाव्या लागतील, तसेच तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पंड्या यांनाही धावा काढाव्या लागतील. शुभमन गिलने चांगली फलंदाजी केली आहे पण अलिकडे त्याच्याकडून अपेक्षित असलेली मोठी खेळी त्याने अद्याप केलेली नाही. भारतीय फलंदाजीमध्ये खूप क्षमता आहे, त्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही.”
सुनील गावसकर यांना असा विश्वास आहे की, फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा संधी सोडणार नाही आणि पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो शतकही करू शकतो.
“अभिषेक शर्मा संधी सोडणार नाही. तो तीन अर्धशतकांसह चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि दुर्दैवाने धावबाद झाल्याने त्याचे शतक हुकले असले तरी, तो आणखी एक मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. कदाचित शतकही करेल”, असे गावसकर म्हणाले.