Abhishek Sharma India vs Pakistan, Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यातही भारतीय संघाने पाकिस्तानवर मात केली. याआधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला होता. आता सुपर ४ फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ गडी राखून दमदार विजय मिळवला आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा हा या विजयाचा शिल्पकार ठरला.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने जबरदस्त सुरुवात करून दिली. अभिषेकने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकून रणशिंग फुंकलं. त्याला गिलची चांगली साथ मिळाली.
भारताची पाकिस्तानवर मात
अभिषेकने २४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तसेच गिलच्या साथीने १०५ धावांची सलामी दिली. गिलने ४७ धावांचं योगदान दिलं तर, अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली. पुढे तिलक वर्माने (१९ चेंडूत ३० धावा) विजयाचा कळस चढवला.
मैदानात राडा
या सामन्यादरम्यान अभिषेक व गिल यांची पाकिस्तानच्या गोलंदाजांबरोबर मैदानात बाचाबाची झाल्याची घटना पाहायला मिळाली. अभिषेकने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. त्यानंतर आफ्रिदी त्याला काहीतरी म्हणाला आणि तिथून वाद सुरू झाला. हा वाद त्याच्या स्पेलमधील पुढच्या षटकातही कायम राहिला. तर थोड्या वेळाने हारिस रौफबरोबरही वाद पेटला. परंतु, अभिषेक व गिलने पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं, तसेच त्यांची गोलंदाजी फोडून काढत बॅटनेही उत्तर दिलं.
अभिषेक शर्माचा इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानला चिमटा
दरम्यान, अभिषेक शर्माची पाकिस्तानवरील कुरघोडी मैदानाबाहेरही पाहायला मिळत आहे. सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माने या सामन्यातील काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. यासह त्याने म्हटलं आहे की ‘तुम्ही बोलत राहिलात आणि आम्ही जिंकलो’. यावर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने म्हटलं आहे की “अभिषेक अजूनही फायर मोडवर आहे”. तर,दुसरा एक युजर म्हणाला, “भावा तू मैदानावर आणि मैदानाबाहेरही पाकड्यांची चांगलीच जिरवलीस.”