Asia Cup 2025 Abhishek Sharma dig Shaheen Afridi IND vs PAK: आशिया चषक चॅम्पियन टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अजेय राहिला. अभिषेक शर्मा आशिया चषक २०२५ चा सर्वाेत्कृष्ट खेळाडू ठरला. अंतिम सामना वगळता अभिषेकने सर्व सामन्यांमध्ये भारताला वादळी सुरूवात करून दिली. अंतिम सामन्यात एक चौकार लगावत अभिषेक बाद झाला. पण संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजाला टोमणा मारला.
अभिषेक शर्माने आशिया चषक २०२५ मध्ये ७ सामन्यांमध्ये ४४.८५ च्या सरासरीने ३१४ धावा केल्या आहेत. अभिषेकने भारताला सर्व सामन्यांमध्ये चांगली सुरूवात करून देत ३० धावांपेक्षा मोठी धावसंख्या रचली आहे. पाकिस्तानविरूद्ध सामन्यात अभिषेक शर्मा विरूद्ध शाहीन आफ्रिदी असं द्वंद्व पाहायला मिळालं. अभिशषेकने आफ्रिदीच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली होती.
अभिषेक शर्माने पाकिस्तानविरूद्ध पहिल्या सामन्यात आफ्रिदीच्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, तर सुपर फोरमधील सामन्यात अभिषेकने षटकाराने सुरूवात केली. यानंतर आफ्रिदी आणि त्याच्यात मैदानावरच वाद झाला होता.
अभिषेक शर्मा शाहीन आफ्रिदीबद्दल नेमकं काय म्हणाला?
सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अभिषेक म्हणाला, “जर तुम्ही पाहिलं, तर मी प्लॅननुसार उतरलो होतो. पॉवरप्लेमध्ये मला फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाज कुणीही गोलंदाजीला आलं तरी मी फटकेबाजी करत पॉवरप्लेमध्येचा फायदा करून घेणार. मग तो वेगवान गोलंदाज असू दे, किंवा मग कोणी प्रीमियम वेगवान गोलंदाजसुद्धा असेल, मी पहिल्याच चेंडूपासून आक्रमण करणार. तेच मी करायचं ठरवलं होतं.”
अभिषेक शर्माने प्रीमियम वेगवान गोलंदाज हा उल्लेख खास शाहीन आफ्रिदीसाठी केला होता. अभिषेकने प्राईम गोलंदाज म्हटल्यानंतर मैदानावर चाहत्यांनी एकदमच जोरजोरात चिअर करायला सुरूवात केली, ते ऐकून अभिषेकही हसू लागला.
अभिषेक शर्मा अंतिम सामन्यात केवळ ५ धावा करून फहीम अशरफकडून बाद झाला. भारत १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवही लवकर माघारी परतल्याने भारताचा डाव कोसळला होता. मात्र तिलक वर्मा, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांनी पुढाकार घेत संघाला विजयाकडे नेलं आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने आपला नववा आशिया चषकाचा किताब पटकावला.