Mohsin Naqvi Condition to give Asia Cup Trophy: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) दुबई येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत नवव्यांदा आशिया चषकाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आशिया चषकात सलग तीनवेळा भारताने पाकिस्तानचा पराभव करत एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. मात्र अंतिम सामन्यांनंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिल्यानंतर एक वेगळेच नाट्य घडले आणि नक्वी ट्रॉफी आणि भारतीय संघाची पदके घेऊन तिथून निसटले.

भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. त्याचे पडसाद दुसऱ्या सामन्यातही उमटले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ याने विमान पाडल्याचे हातवारे करून भारताला डिवचले. त्याचबरोबर पीसीबी तथा एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनीही आपल्या एक्स हँडलवर अशीच पोस्ट शेअर केली. मात्र नंतर ती डिलीट केली.

फक्त आशिया चषकच नाही तर यापूर्वीही मोहसीन नक्वी यांनी भारताविरोधात विधाने केलेली आहेत. त्यामुळे भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर मोहसीन नक्वी यांची थेट ट्रॉफी आणि पदके पळवली. बीसीसीआयने भारताची ट्रॉफी आणि पदके परत करावीत, अशी मागमी केल्यानंतर आता नक्वी यांनी एका अटीवर यासाठी तयारी दर्शवली आहे.

मोहसीन नक्वींनी कोणती अट ठेवली?

क्रिकबझ संकेतस्थळाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, नक्वी भारताची ट्रॉफी आणि पदके परत देण्यास तयार झाले आहेत. पण एक औपचारिक कार्यक्रम आयोजित केला जावा आणि त्यांच्या हस्तेच ट्रॉफी तसेच पदकांचे वितरण व्हावे, अशी अट त्यांनी ठेवली आहे.

अर्थातच बीसीसीआय यासाठी तयार होईल, अशी शक्यता वाटत नाही. तीनही सामन्यात झालेल्या वादावादीनंतर हे प्रकरण इतक्या सहज सुटेल, अशी शक्यता नसल्याचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. अद्याप बीसीसीआयने नक्वी यांच्या विधानावर टिप्पणी केलेली नाही.

दरम्यान मोहसीन नक्वींनी ट्रॉफीसह पळ काढल्यानंतर कर्णधार सूर्यकुमारने यावर प्रतिक्रिया दिली आहे. एएनआयशी संवाद साधत असताना सूर्यकुमार यादव म्हणाला, तुम्ही पाहिले असेल आम्ही ट्रॉफीबरोबर जल्लोष करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. खरी ट्रॉफी तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही लोकांचे मन जिंकता. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने दाखवलेला विश्वास हीच खरी ट्रॉफी आहे. जी ट्रॉफी विजयानंतर मिळणार आहे, ते फक्त सन्मानचिन्ह आहे.”

रविवारी दुबईच्या मैदानावर काय घडले?

पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केल्यानंतर भारतीय संघ दुबईच्या मैदानावर आनंद साजरा करत होते. दुसरीकडे सामना संपून जवळपास तासाभरचा कालावधी लोटल्यानंतरही पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आले नाही. प्रोटोकॉलनुसार आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना पारितोषिक वितरण करायचे होते, पण ते एकटेच व्यासपीठावर उभे होते. जवळपास ५५ मिनिटांनंतर अखेर सलमान आगा आणि त्याचे सहकारी मैदानावर आले. मात्र, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वी यांच्याकडून जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला.

फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी आपापली वैयक्तिक पारितोषिकं घेतली, पण भारतीय संघाने एकत्रितपणे ट्रॉफी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी व्यासपीठावर पाऊल ठेवले नाही. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सायमन डुल यांनी भारतीय संघ आज रात्री आपले पारितोषिक स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले.