Abhishek Bachchan Remark after Shoaib Akhtar slip-up: एका टिव्ही शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने म्हटले की, पाकिस्तानी संघाने अभिषेक बच्चनला लवकर बाद केले तर संघाचा विजय सोपा होईल. शोएब अख्तरच्या या विधानाची खिल्ली खुद्द अभिषेक बच्चनने उडवली आहे. अभिषेकने केलेली एक्स पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडियावरही या विषयावर अनेक मीम्स तयार होत असून लोक ते शेअर करत आहेत.

रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे. इंटरनेट, सोशल मीडियावरही सामन्याची चर्चा आहे. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केलेल्या त्या विधानामुळे पाकिस्तानी संघ आणि त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

शोएब अख्तरने काय म्हटले?

‘गेम ऑन है’ या पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये चर्चा करत असताना शोएब अख्तरने अंतिम सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी काय करावे लागेल, याची योजना मांडली. “भारताला हरवायचं असेल तर पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर बाद करावे. कारण त्यांच्या मधल्या फळीतीली फलंदाज चांगला खेळ दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचा विजय सुकर होईल”

शोएब अख्तरने चुकून अभिषेक बच्चनचे नाव घेतल्यानंतर सूत्रसंचालक आणि इतरांनी त्याला दुरूस्त केले. ‘तुला अभिषेक शर्मा म्हणायचे आहे का?’, असे सांगितल्यानंतर स्टुडीओमध्ये हशा पिकला. त्यानंतर शोएब अख्तरने चूक सुधारत अभिषेक बच्चन नाही तर अभिषेक शर्मा म्हणायचे होते, असे स्पष्ट केले.

अभिषेक बच्चनकडून पाकिस्तानी संघाची फिरकी

दरम्यान शोएब अख्तरच्या विधानाची चर्चा रंगली असताना अभिषेक बच्चननेही एक्सवर पोस्ट करून पाकिस्तानी संघाला टोला लगावला. भारतातील एका वृत्तपत्राची बातमी शेअर करत त्याने म्हटले, “सर, आदर ठेवून सांगतो. ते एवढंही करू शकणार नाहीत. मी क्रिकेट फारसा चांगला खेळत नसलो तरी.”

Abhishek Bachhan Tweet
अभिषेक बच्चनची X वरील पोस्ट व्हायरल.

आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये प्रथमच अंतिम सामना खेळवला जात आहे. भारताने सुपर फोर टप्प्यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर पाकिस्तानने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. यानंतर आता अंतिम फेरीसाठी शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला भारताचा पराभव करण्यासाठी खास संदेश दिला.

शोएभ अख्तर आशिया चषकाच्या सुरुवातीपासून टीव्ही शो दरम्यान पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर आसूड ओढत होता. मात्र गुरुवारी बांगलादेशला हरवून पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक दिल्यानंतर त्याने संघाचे कौतुक केले. तसेच पाकिस्तानचा संघ भारताला हरवण्यास सक्षम आहे, असेही म्हटले.