गुडघ्याच्या दुखापतीमुळे दोन वर्षे स्पर्धात्मक खेळापासून दूर असलेल्या आदिती मुटाटकर हिने अग्रमानांकित अरुंधती पानतावणे हिला नमवून व्ही. व्ही. तथा दाजीसाहेब नातू करंडक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत आदिती हिने चुरशीच्या लढतीत २०-२२, २१-१६, २१-१२ असा विजय मिळविला. दोन्ही खेळाडूंनी अव्वल दर्जाचा खेळ केला. पहिला गेम गमावल्यानंतरही आदितीने आत्मविश्वास दाखवत खेळावर नियंत्रण मिळविले. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासून तिने आघाडी घेतली व शेवटपर्यंत टिकवली. हा गेम घेत तिने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या गेममध्येही तिने प्रारंभापासूनच अरुंधती हिला आघाडी मिळविण्याची संधी दिली नाही. हा सामना तिने पाऊण तासात जिंकला.
उपांत्य फेरीत आदितीला पुण्याचीच आंतरराष्ट्रीय खेळाडू सायली गोखलेशी खेळावे लागणार आहे. चौथ्या मानांकित सायलीविरुद्धच्या सामन्यात तृप्ती मुरगुंडे हिने पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतली. त्यावेळी सायलीकडे २१-१५, ११-३ अशी आघाडी होती.
अन्य लढतीत एअर इंडियाची खेळाडू तन्वी लाड हिने विमानतळ प्राधिकरणाची खेळाडू नेहा पंडित हिच्यावर १६-२१, २१-१५, २३-२१ असा रोमहर्षक विजय मिळविला. तिसऱ्या गेममध्ये नेहाकडे १९-१४ अशी आघाडी होती. तेथून तन्वी हिने प्लेसिंगचा सुरेख खेळ करीत सलग सहा गुण घेतले. त्यानंतर विलक्षण चुरस पाहावयास मिळाली. अखेर ही गेम २३-२१ अशी घेत तन्वीने सामना जिंकला.
तृतीय मानांकित पी. सी. तुलसी हिने महाराष्ट्राच्या रिया पिल्ले हिचे आव्हान २१-१८, २१-७ असे संपुष्टात आणले.
पुरुषांच्या गटात अग्रमानांकित बी. साईप्रणीत याने पाचव्या मानांकित अभिमन्यू सिंग याचा २१-५, २१-६ असा धुव्वा उडविला. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा बहारदार खेळ केला.
मिश्र दुहेरीत अक्षय देवलकर व प्रज्ञा गद्रे यांनी अपराजित्व राखताना अरुण विष्णू व अपर्णा बालन या अग्रमानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला. हा सामना त्यांनी १९-२१, २१-११, २१-११ असा जिंकला. अश्विनी पोनप्पा व तरुण कोना या तृतीय मानांकित जोडीने आव्हान राखले. त्यांनी के. नंदगोपाळ व जे. मेघना या जोडीचा २१-११, २२-२० असा पराभव केला.

jyoti surekha vannam
ज्योतीची सुवर्ण हॅट्ट्रिक;  विश्वचषक तिरंदाजीमध्ये कम्पाऊंड प्रकारात भारताला पाच पदके
Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
Indian men women team entered archery world cup 2024 finals
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक 
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव