पीटीआय, नवी दिल्ली

लिओनेल मेसीप्रमाणेच तारांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही या वर्षी भारतात येण्याची शक्यता आहे. ‘एएफसी चॅम्पियन्स लीग-२’च्या आगामी हंगामासाठीची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी क्वालालम्पूर येथे जाहीर करण्यात आली. यात इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) संघ एफसी गोवा आणि रोनाल्डोच्या अल नासर क्लबचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रोनाल्डो भारतात स्पर्धात्मक खेळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेला १६ सप्टेंबरपासून सुरुवात होईल.

पाच वेळच्या बॅलन डी’ओर पुरस्कार विजेत्या रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील सौदी अरेबियातील क्लब अल नासर यंदा ‘एएफसी चॅम्पियन्स लीग’च्या ‘एलिट’ गटात पात्रता मिळवू शकला नाही. त्यामुळे त्यांना ‘एएफसी चॅम्पियन्स लीग-२’मध्ये खेळावे लागेल. ‘ड’ गटात अल नासर आणि एफसी गोवा यांच्यासह इराकचा अल जवारा एससी आणि ताजिकिस्तानचा एफसी इस्तिकलोल संघांचा समावेश आहे.

एफसी गोवा संघ या वर्षीचा सुपर चषक विजेता आहे आणि ‘आयएसएल’च्या २०२४-२५ च्या हंगामात त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. अल जावरा संघ ‘एएसी इराक स्टार्स लीग’ २०२४-२५ चा उपविजेता आहे. एफसी इस्तिकलोल ‘ताजिकिस्तान हायर लीग २०२४’ चा विजेता आहे. ‘चॅम्पियन्स लीग’मध्ये प्रत्येक संघ गटातील अन्य संघांविरुद्ध दोन साखळी सामने खेळतो. यातील एक सामना घरच्या मैदानावर, तर दुसरा सामना अन्य संघाच्या मैदानावर होतो. मात्र, रोनाल्डो एफसी गोवाविरुद्धच्या सामन्यासाठी भारतात येणारच हे निश्चित नाही. २०२३ मध्ये मुंबई सिटी एफसी आणि नेयमारच्या अल हिलाल संघासह एकच स्थान देण्यात आले होते. मात्र, नेयमारने मुंबईत झालेला सामना खेळला नव्हता.

एफसी गोवाने मडगावमध्ये बुधवारी झालेल्या ‘प्ले-ऑफ’ सामन्यात ओमानचा क्लब अल सीबला २-१ असे नमवत साखळी फेरीसाठी पात्रता मिळवली होती. ते या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभाग नोंदवतील. यापूर्वी २०२१ च्या ‘एएफसी’ चॅम्पियन्स लीगमध्ये ते खेळले होते. यंदाच्या स्पर्धेत मोहन बागान सुपर जायंट्स हा अन्य भारतीय संघ खेळणार आहे. मोहन बागानला ‘क’ गटात इराणचा सेपाहान, जॉर्डनचा अल हुसैन एससी आणि तुर्कमेनिस्तानच्या अहल एफसी संघासह स्थान मिळाले आहे. यंदा साखळी सामने १६ सप्टेंबर ते २४ डिसेंबरदरम्यान होणार आहेत. त्यानंतर बाद फेरीला सुरुवात होईल. अंतिम सामना १६ मे २०२६ रोजी रंगणार आहे.

उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह

‘एएफसी चॅम्पियन्स लीग-२’मध्ये अल नासर आणि एफसी गोवा यांच्यात भारतातही सामना होणार आहे. मात्र, रोनाल्डो यात खेळणारच हे अद्याप निश्चित नाही. गतहंगामात अल नासरचा संघ चॅम्पियन्स लीगच्या ‘एलिट’ गटात खेळला. त्या वेळी इराणमध्ये झालेल्या सामन्यात रोनाल्डोने सहभाग नोंदवला होता. त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये अलोट गर्दी उसळली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उपस्थित राहिले. त्यामुळे रोनाल्डोने क्लबचे सौदी अरेबियाबाहेरील सामने खेळू नये, असे त्याला सुरक्षा पुरविणाऱ्या संस्थेकडून सांगण्यात आले आहे. भारतातही रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथेही सुरक्षेचा प्रश्न उद्भवू शकतो. याच कारणास्तव, भारतातील सामन्यासाठी रोनाल्डोच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे.