scorecardresearch

AFG VS PAK: शारजाहमध्ये झाली पाकिस्तानची नाचक्की! दुसरा टी२० सामना जिंकत अफगानिस्तानने रचला इतिहास

अफगाणिस्तानने दुसऱ्या टी२० सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह अफगाणिस्तानने आशिया चषकामधील पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा बदला पूर्ण केला आहे.

AFG VS PAK: Afghanistan defeated Pakistan for the first time in a series, won the second T20 by seven wickets
सौजन्य- आयसीसी (ट्विटर)

अफगाणिस्तानने दुसऱ्या टी२० सामन्यातही पाकिस्तानचा सात विकेट्स राखून पराभव केला. हा सामना जिंकण्याबरोबरच अफगाणिस्तानने पाकिस्तानला तीनही फॉरमॅट एकत्र करून आंतरराष्ट्रीय मालिकेत प्रथमच पराभूत केले आहे. पहिला टी२० अफगाणिस्तानने सहा विकेटने जिंकला होता. राशिद खान अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे, तर शादाब खान पाकिस्तानची कमान सांभाळत आहे. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान पाकिस्तानकडून या मालिकेत खेळत नाहीत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाला २० षटकांत ६ बाद १३० धावा करता आल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने १९.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. या दोघांमधील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना २७ मार्च रोजी होणार आहे.

दोन्ही संघांची आकडेवारी

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण दोन टी२० द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील एक मालिका पाकिस्तानने आणि दुसरी (ही मालिका) अफगाणिस्तानने जिंकली आहे. अफगाणिस्तानने शेवटचा टी२० जिंकल्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण पाच टी२० सामने खेळले गेले आहेत. तीन सामने पाकिस्तानने तर दोन सामने अफगाणिस्तानने जिंकले आहेत. त्याच वेळी, दोन्ही संघ वनडेत चार वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानचा चार वेळा पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये एकही कसोटी सामना खेळला गेला नाही.

पाकिस्तानचा डाव

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फजलहक फारुकीने सॅम अयुबला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर पुढच्याच चेंडूवर फजलहकने अब्दुल्ला शफीकला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला हॅट्ट्रिकची संधी होती, पण नवा फलंदाज तय्यब ताहिरने ती होऊ दिली नाही. यानंतर मोहम्मद हरीसने तैयबसोबत तिसऱ्या विकेटसाठी २० धावांची भागीदारी केली. नवीन-उल-हकने हरिसला यष्टिरक्षक गुरबाजच्या हाती झेलबाद करून पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. हरिसला नऊ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५ धावा करता आल्या. करीम जनातने तयेब ताहिर (१३) आणि रशीद खानने आझम खानला (१) बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का दिला. यानंतर इमाद वसीम आणि कर्णधार शादाब यांनी सहाव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली.

वसीमने शानदार अर्धशतक झळकावले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. गेल्या वर्षी त्याला पाकिस्तानने संघातून वगळले होते. इमादने ५७ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. त्याचवेळी डावाच्या शेवटच्या चेंडूवर शादाब धावबाद झाला. त्याला २५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३२ धावा करता आल्या. अफगाणिस्तानकडून फजलहकने सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. तर नवीन, रशीद आणि जनात यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

अफगाणिस्तानचा डाव

१३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात दमदार झाली. रहमानउल्ला गुरबाज आणि उस्मान घनी यांनी पहिल्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. घनी सात धावा करून जमान खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली आणि इथे पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले गेले. गुरबाज ४९ चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. इब्राहिमही ४० चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३८ धावा करून झेलबाद झाला. सरतेशेवटी नजीबुल्ला झद्रान आणि मोहम्मद नबी यांनी सावध खेळ करत अफगाणिस्तान संघाला एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.

हेही वाचा: BCCI Annual Contract: भुवनेश्वर-रहाणेला स्पष्ट संकेत, केएल राहुलला इशारा; BCCIच्या केंद्रीय कराराचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

अफगाणिस्तानने आता आयर्लंड, बांगलादेश व श्रीलंका यांच्यानंतर पाकिस्तानला देखील पराभूत करण्याची किमया केली आहे. राशिद खान याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाला आगामी काळात मोठे भवितव्य असल्याचे सांगितले जाते. मागील वर्षी आशिया चषकात देखील त्यांनी भारत व पाकिस्तान यांना घाम फोडलेला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या