आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची सहमालकीण प्रिती झिंटा ही क्रीडा क्षेत्रात आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करते आहे. टी-२० ग्लोबल लिग स्पर्धेत प्रिती झिंटाने ‘स्टेलनबॉश मोनार्श’ या संघाची मालकी स्विकारली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लोगार्ट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाहरुख खाननंतर लिग स्पर्धांची मालकी स्विकारणारी प्रिती झिंटा ही दुसरी भारतीय ठरली आहे. शाहरुख खानकडे केपटाऊन नाईट रायडर्स या संघाची मालकी आहे.

“प्रिती झिंटाच्या येण्याने मला अतिशय आनंद झाला आहे. टी-२० ग्लोबल लिग स्पर्धेला प्रितीच्या येण्यामुळे एक वेगळीच उंची प्राप्त होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत आणि ग्लोबल लिग परिवारात मी प्रिती झिंटाचं मनापासून स्वागत करतो”, पत्रकारांशी बोलताना लोगार्ट यांनी आपली प्रतिक्रिया दिली. प्रिती झिंटानेही एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करुन लोगार्ट यांचे आभार मानले आहेत. “दक्षिण आफ्रिकेतील उदयोन्मुख खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक सर्वोत्तम व्यासपीठ ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक या स्पर्धेला हजेरी लावून आपल्या आवडत्या खेळाडूंना पाठिंबा देतील, अशी आशा आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आक्रमक फलंदाज फॅफ डू प्लेसी हा प्रिती झिंटाच्या संघातला महत्वाचा खेळाडू आहे. डू प्लेसीनेही प्रिती झिंटासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं सांगितलंय. प्रितीच्या येण्याने आमच्या संघाला अधिक पाठिंबा मिळेलं असं डू प्लेसी म्हणाला.