दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर फलंदाज एडन मारक्रमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण वादळी शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मारक्रमने ही महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात त्याच्या शतकाच्या जोरावर आणि तेंबा बावूमाच्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

एडन मारक्रमने त्याच्या कारकिर्दीतील हे आठवं शतक मोक्याच्या क्षणी केलं आहे. मारक्रमच्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ सामन्यात पुढे आहे. आता दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजयासाठी फक्त ६९ धावांची आवश्यकता आहे. दरम्यान या शतकी खेळीनंतर मारक्रमने कोणतंच मोठं सेलिब्रेशन केलं नाही. त्याने हेल्मेट काढून बॅट उंचावली आणि कर्णधार बावूमाला मिठी मारली. पण याच मारक्रमने एकदा शतकाच्या सेलिब्रेशनमुळे आपल्या हाताला दुखापत करवून घेतली होती.

२०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात होता. मारक्रम आफ्रिका संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. सराव सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मारक्रमला पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पुणे इथल्या कसोटीदरम्यान दुसऱ्या डावात बाद झाल्यानंतर मारक्रमने रागाच्या भरात हात आपटला. मारक्रमच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली.

रागाच्या भरात मारक्रमने स्वत:लाच करून घेतली होती दुखापत

विशाखापट्टणम आणि पुणे कसोटी आफ्रिकेने गमावली होती. मारक्रमची दुखापत गंभीर असल्याने त्याला मायदेशी पाठवण्यात आलं. उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत तो खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. सराव सामन्यात मारक्रमने शतक झळकावलं होतं. विशाखापट्टणम कसोटीत त्याला ५ आणि ३९ धावाच करता आल्या. पुणे कसोटीत तर मारक्रमला दोन्ही डावात भोपळाही फोडता आला नव्हता. यामुळेच तो नाराज झाला. रागाच्या भरात त्याचा हात जोरात आपटला.

क्रिकेट साऊथ आफ्रिकेने त्यावेळी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मारक्रमच्या मनगटाचं सिटी स्कॅन करण्यात आलं. त्याच्या मनगटाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं आहे. उर्वरित दोन कसोटीत तो खेळू शकणार नाही. मायदेशी पोहोचताच तो पुढच्या उपचारांसाठी विशेषज्ञांची भेट घेईल. मारक्रमच्या ऐवजी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आलेली नाही.

नाराज मारक्रमने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं होतं. “अशा पद्धतीने घरी परतावं लागणं नामुष्कीचं आहे. मी गंभीर अशी चूक केली आहे. मी याची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. पुन्हा माझ्या हातून असं वर्तन होणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संस्कृतीत असं वर्तन अपेक्षित नाही. मी संघाच्या विश्वासाला पात्र ठरु शकलो नाही याचं दु:ख आहे. मी यातून शिकलो आहे. खेळताना भावना अनावर होतात. पण असं वर्तन योग्य नाही. मी संघ सहकाऱ्यांची माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिकेचे चाहते मला समजून घेतील अशी आशा आहे”.

मारक्रमने संघातून वगळल्यानंतर कसं केलं होतं पुनरागमन?

या घटनेतून बोध घेत मारक्रमने दक्षिण आफ्रिकेसाठी दमदार पुनरागमन केलं. त्याला संघातून वगळण्यातही आलं होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावांच्या राशी ओतत मारक्रम पुन्हा संघात परतला. टेस्ट, वनडे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात सातत्याने धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये मारक्रमची गणना होते. मारक्रमने दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली आहे. सलामीवीर तसंच मधल्या फळीतला महत्त्वपूर्ण फलंदाज अशी मारक्रमची ओळख आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कसोटीच्या चौथ्या डावात संघासाठी शतकी खेळी करत तो महत्त्वाचा खेळाडू हे सिद्ध केलं. मारक्रम याच कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता. पण दुसऱ्या कसोटीत सावध पण वेळ पडेल तिथे आक्रमक खेळी करत मारक्रमन १०२ धावांची नाबाद खेळी करत तिसऱ्या दिवशी माघारी परतला आहे. यासह दक्षिण आफ्रिका इतिहास घडवत पहिला क्रिकेट वर्ल्डकप पटकावणार का यावर सर्वांच्या नजरा आहेत.