Australia vs South Africa, Aiden Markram Century: दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्याचा उंबरठ्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८२ धावांचे आव्हान आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज जिद्दीने खेळपट्टीवर टिकून राहिले. सुरूवातीला २ मोठे धक्के बसले. पण त्यानंतर कर्णधार तेंबा बावूमाने शानदार अर्धशतकी खेळी केली आणि एडेन मारक्रमने दक्षिण आफ्रिकेसाठी अतिशय महत्वाच्या सामन्यात शानदार शतकी खेळी केली. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या कुठल्याही फलंदाजाला आयसीसीच्या फायनलमध्ये शकत झळकावता आलं नव्हतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि एडेन मारक्रमसाठी हे शतक ऐतिहासिक ठरलं आहे.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी २८२ धावांची गरज आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर इतक्या मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग करणं मुळीच सोपं नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे ते पाहता आता हा पाठलाग सोपा वाटू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिक्लटन आणि एडेन मारक्रमची जोडी सलामीला आली.

या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, रिकल्टन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. त्याला ८ चेंडूत अवघ्या ६ धावा करता आल्या. रिकल्टन बाद झाल्यानंतर, मुल्डरने एडेन मारक्रमची चांगली साथ दिली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मिळून ६१ धावा जोडल्या. दोघांची जोडी जमली होती. मात्र, चेंडू थांबून आला आणि मुल्डर २७ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला.

मारक्रमचं शतक, टेंबा बावुमाची साथ

एडेन मारक्रमने या डावात १५७ चेंडूंचा सामना करत ११ चौकारांच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. सामन्यातील चौथ्या डावात गोलंदाजांना मदत मिळत नव्हती. याचा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. चेंडूला उसळी आणि स्विंग मिळत नव्हता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना धावा करणं सोपं झालं. मात्र, खेळपट्टीवर टिकून राहण्याचं मोठं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसमोर होतं. टेंबा बावुमा आणि मार्करम ही जोडी खंबीरपणे उभी राहिली. दोघांनी मिळून १५० पेक्षा अधिक धावा जोडल्या. यादरम्यान टेंबा बावुमानेही अर्धशतकी खेळी केली.

दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. २८२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रमने शानदार शतकी खेळी केली. तर तेंबा बावूमाने दमदार अर्धशतकी खेळी केली. तिसऱ्या दिवसाअखेर एडेन मारक्रम १०२ तर तेंबा बावूमा ६५ धावांवर माघारी परतला आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत २१३ धावांपर्यंत मजल मारली आहे. चौथ्या दिवशी या संघाला अवघ्या ६९ धावांची गरज असणार आहे.