पीटीआय, अरुन्डेल (पोर्ट्समथ)
जवळपास दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमध्येही सकारात्मक खेळ करण्याचा निश्चय केला आहे. तसेच भूतकाळाबाबत विचार न करता आपण पुन्हा नव्याने सुरुवात करणार असल्याचेही रहाणे म्हणाला.रणजी करंडक आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गेल्या हंगामातील दमदार कामगिरीच्या बळावर रहाणेने भारताच्या कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’च्या १६व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करताना रहाणेने १४ सामन्यांच्या ११ डावांत १७२.४८च्या धावगतीने ३२६ धावा केल्या. त्याने १६ षटकारही मारले. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध २७ चेंडूंत ६१ धावांची, तर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २९ चेंडूंत नाबाद ७१ धावांची खेळीही साकारली. त्याने आपल्या खेळात केलेल्या सुधारणेमुळे त्याचे बरेच कौतुकही झाले. आता ७ जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यातही असाच सकारात्मक खेळ करण्यासाठी रहाणे उत्सुक आहे.




‘‘१८-१९ महिन्यांनंतर माझे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यानच्या काळात जे झाले, मग ते चांगले असो किंवा वाईट, त्याचा विचार करायचा नाही असे मी ठरवले आहे. मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीत रहाणे म्हणाला.
‘‘मला चेन्नईकडून खेळताना खूप मजा आली. मी ‘आयपीएल’मध्ये आणि त्यापूर्वीही चांगली फलंदाजी करत होतो. देशांतर्गत हंगामात मी सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे मी समाधानी होतो. आता भारतीय संघातील पुनरागमनामुळे मी थोडा भावूक झालो आहे. ‘आयपीएल’ आणि रणजी करंडकात मी ज्याप्रकारे फलंदाजी केली, तशीच पुढेही करत राहणार आहे. मी ट्वेन्टी-२० खेळत आहे किंवा कसोटी क्रिकेट, याचा विचार करणार नाही. माझा यापुढेही सकारात्मक खेळ करण्याचा प्रयत्न असेल. मी फार विचार करून त्याचा माझ्या कामगिरीवर परिणाम होऊ देणार नाही,’’ असे रहाणेने सांगितले.
रहाणेच्या गाठीशी ८२ सामन्यांचा अनुभव असून त्याने ४९३१ धावा केल्या आहेत. तो ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम समान्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणे अपेक्षित आहे.
भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर मला कुटुबीयांनी जो पाठिंबा दिला, त्यासाठी मी त्यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. भारतासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते आणि आजही आहे. मी तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली, पुन्हा देशांतर्गत क्रिकेट खेळलो. मी तेथेही प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. मला कोणत्याही गोष्टीचे शल्य नाही. मी मुंबई रणजी संघातील प्रत्येक खेळाडूकडून काही तरी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मला भारतीय संघात पुनरागमन करणे शक्य झाले आहे. – अजिंक्य रहाणे