Ajinkya Rahane Captaincy देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना सुरूवात झाली आहे. तामिळनाडूत बुची बाबू क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. येत्या काही दिवसात रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेला देखील सुरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला निर्णय सांगितला आहे. गेल्या काही वर्षांपासून तो या संघाचं नेतृत्व करत आहे. यादरम्यान त्याने मुंबईला जेतेपदही मिळवून दिलं.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
अजिंक्य रहाणेने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “मुंबई संघाचं नेतृत्व करणं आणि संघाला चॅम्पियन बनवणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद होतं. देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे नव्या कर्णधाराला तयार करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळेच मी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”
तसेच त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “मी खेळाडू म्हणून सर्वकाही देण्यासाठी कायम कटिबद्ध आहे. खेळाडू म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबतचा प्रवास असाच सुरू राहणार आहे. जेणेकरून आणखी जेतेपदं जिंकता येतील. आगामी हंगामाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने २०२३-२४ हंगामाच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. गेल्या ७ वर्षांपासून मुंबईला रणजी ट्रॉफीत जेतेपद पटकावता आलं नव्हतं. पण रहाणेच्या नेतृत्वात खेळताना मुंबईने ही प्रतीक्षा संपवली आणि जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.
अजिंक्य रहाणेची कारकिर्द
अजिंक्य रहाणेकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७६ सामने खेळण्याचा अनुभव आहे. यादरम्यान फलंदाजी करताना त्याने ५२ च्या सरासरीने ५९३२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतकं झळकावली आहेत. यासह अजिंक्य रहाणे हा वासिम जाफरनंतर मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. रहाणेने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण आगामी हंगामात तो मुंबईकडून खेळताना दिसू शकतो. तर रहाणेनंतर मुंबईचा कर्णधार कोण होणार? अशी चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे.