भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानात सहभागी होण्यासाठी मोदींकडून अजिंक्य रहाणेला निमंत्रण पत्र पाठवण्यात आले होते. याबद्दल रहाणेने मोदींचे आभार मानले आहेत. देशभरात सध्या सरकारकडून ‘स्वच्छता हीच सेवा’ अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेटपटूंनी याआधीही सामाजिक कल्याणाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली मागील वर्षी गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी झाला. त्यावेळी कोहलीने ईडन गार्डनवरील सफाई अभियानात सहभाग घेतला होता. ‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांच्या माध्यमातून देशातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण व्हावी, याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे.

पंतप्रधान मोदींनी निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून अजिंक्य रहाणेला ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. हे अभियान १५ सप्टेंबरपासून देशभरात राबवले जात आहे. २ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. देशवासियांना सफाई अभियानात सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी निमंत्रण पत्रिकेतून केले आहे. मोदींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो रहाणेने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘आदरणीय नरेंद्र मोदीजी, तुमचे हे पत्र मिळाल्याने अतिशय आनंद झाला आहे. स्वच्छता हीच सेवा या अभियानात सहभागी होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे,’ असे रहाणेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीदेखील ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे. सध्या अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करतो आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रहाणेने शानदार अर्धशतक झळकावले. या मालिकेत भारतीय संघ २-० ने आघाडीवर आहे. या मालिकेतील तिसरा सामना उद्या (रविवारी) इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.