Akashdeep Joe Root Wicket Video Viral IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या खेळाडूंनी कमाल कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही विभागात खेळाडू आपलं योगदान देताना दिसत आहे. फलंदाजीत शुबमन गिलने विक्रमी धावसंख्या उभारली आहे, तर गोलंदाजी आकाशदीपने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आकाशदीपने दुसऱ्या डावात बेन डकेट आणि जो रूट यांना क्लीन बोल्ड केलं. पण रूटला बाद करणं ही त्याची ड्रीम विकेट असणार आहे. या विकेटचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडमुळे बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळत नाहीये. त्यामुळे बुमराहच्या जागी आकाशदीपला दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली आहे. आकाशदीपने भेदक गोलंदाजी करत बुमराहची फारशी उणीव भासू दिली नाही. आकाशदीपने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या. ज्यात ३०३ धावांची ब्रुक आणि स्मिथची भागीदारी तोडणारी विकेट महत्त्वाची होती. ज्यात त्याने ब्रुकला क्लीन बोल्ड केलं होतं.
आकाशदीपने आता दुसऱ्या डावातही २ मोठ्या विकेट घेत इंग्लंडला धक्के दिले आहे. भारताने दुसऱ्या डावात ६ बाद ४२२ धावांवर डाव घोषित केला. ज्यामध्ये भारताला पहिल्या डावातील १८० धावांची आघाडी मिळाली होती. याचा अर्थ आता भारताकडे एकूण ६०७ धावांची मोठी भक्कम आघाडी आहे. तर इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावा कराव्या लागणार आहेत. पण इंग्लडने चौथ्या दिवशीच तीन मोठे विकेट गमावले आहेत.
इंग्लंडने जॅक क्रॉली, बेन डकेट आणि जो रूट यांच्या रूपात ३ विकेट्स गमावल्या. आकाशदीपने डकेट आणि रूटला क्लीन बोल्ड केलं. ज्यापैकी जो रूटची विकेट कमालीची होती. त्याचा चेंडू पाहून सगळेच चकित झाले होते. रूटला बाद करणं म्हणजे निम्मा इंग्लंडचा संघ बाद करण्यासारखं आहे. जो रूट हा कसोटी क्रिकेटमधील सध्याचा वर्ल्ड नंबर वन फलंदाज आहे. त्याची विकेट ही आकाशदीपसाठी नक्कीच ड्रीम विकेट होती.
आकाशदीपचा ड्रीम बॉल आणि जो रूट क्लीन बोल्ड
जो रूट आकाशदीपच्या ११व्या षटकात बाद झाला. आकाशदीपने क्रीजच्या वाईड चेंडू टाकला, चेंडू पडल्यानंतर कमालीचा अँगल तयार झाला. रूटने बॅटचा फेस क्लोज केला आणि चेंडू खेळण्यासाठी पुढे गेला. तितक्यात त्याच्या बॅटची कड घेत चेंडू जाऊन ऑफ स्टम्पवर आदळला आणि रूट क्षणात क्लीन बोल्ड झाला. रूट विकेटकडे न बघताच निघून गेला. आकाशदीपचा कमालीचा चेंडू पाहून टीम इंडियाचे खेळाडूही चकित झाले. पंतने चकित झाल्याचे हावभाव दिले. तर कर्णधार गिलने थेट डोक्यावरच हात ठेवले. आकाशदीपच्या या विकेटचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १६ षटकांत ३ बाद ७२ धावा केल्या. यासह इंग्लंडला विजयासाठी आता ५३६ धावांची गरज आहे. इंग्लंडकडून आता मैदानावर हॅरी ब्रुक १५ नाबाद धावा आणि ऑली पोप २४ नाबाद धावा करत कायम आहेत. भारताला विजयासाठी ७ विकेट्सची गरज आहे.