Akashdeep Took 10 Wickets, Ind vs Eng: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमहॅमच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला इंग्लंडचा संपूर्ण डाव अवघ्या २७१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ३३६ धावांनी आपल्या नावावर केला. हा भारतीय संघाचा बर्मिंघमहॅममध्ये मिळवलेला पहिलाच विजय ठरला आहे. याआधी भारतीय संघाने या मैदानावर एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. त्यामुळे गिल अँड कंपनीसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला आहे.
आकाशदीपने घेतल्या १० विकेट्स
या डावात भारतीय फलंदाजांनी आपली भूमिका योगरित्या पार पाडली. भारताचा कर्णधार शुबमन गिलने दोन्ही डावात मिळून ४०० हून अधिक धावा केल्या. यासह तो या सामन्याचा सामनावीर ठरला. फलंदाजीत गिल,जैस्वाल आणि ऋषभ पंत यांनी कमाल केली. तर गोलंदाजीत आकाशदीप आणि मोहम्मद सिराज चमकला.
या सामन्यातील दोन्ही डावात मिळून आकाशदीपने १० गडी बाद केले. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. आता दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या ६ फलंदाजांना माघारी धाडलं. यासह त्याने दोन्ही डावात मिळून १० गडी बाद केले. आकाशदीपने मोक्याच्या क्षणी विकेट्स काढून दिल्या. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज दबावात आले होते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला. यासह पहिल्यांदाच एका कसोटीत १० गडी बाद करण्याचा कारनामा केला.
भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय
हा विजय भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण याआधी भारतीय संघाला एजबस्टनमध्ये कधीच विजय मिळवता आला नव्हता. आता पहिल्यांदाच भारतीय संघाने एजबस्टनमध्ये खेळताना विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी विकेट्सची रांग लावली. दरम्यान हा सामना जिंकून भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत कमबॅक करत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.