खेळ कुठलाही असो, भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असले की मुकाबला कट्टर होतो. युवा विश्वचषकाच्या लढतीतही याचा प्रत्यय आला. भारतीय संघाने विश्वचषकाचे अभियान पाकिस्तानवर विजयासह साजरे केले. मुंबईकर सर्फराझ खानने अष्टपैलू खेळ करत या विजयात महत्त्वाची भूूमिका बजावली.
भारतीय संघाने दिलेल्या २६३ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी १०९ धावांची सलामी दिली. मात्र यानंतर दीपक हुडाच्या भेदक गोलंदाजांच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा डाव २२२ धावांत गुंडाळला आणि ४० धावांनी विजय मिळवला. विजय झोल आणि आमिर गनी यांनी समी अस्लमला धावचीत करत सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. समीने ६४ धावांची खेळी केली. इमाम उल हकने ३९ धावा केल्या. सौद शकीलने ३२ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुराच ठरला. मूळच्या हरयाणाच्या मात्र बडोद्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक हुडाने ४१ धावांत ५ बळी घेतले. तत्पूर्वी मुंबईकर सर्फराझ खान आणि संजू सॅमसनच्या आक्रमक खेळीच्या बळावर भारतीय संघाने २६२ धावांची मजल मारली. अंकुश बैन्स आणि अखिल हेरवाडकरने ६५ धावांची सलामी दिली. मात्र यानंतर अंकुश आणि अखिल दोघेही बाद झाले. कर्णधार विजय झोल केवळ ३ धावा करून तंबूत परतला. रिकी भुईला एक धाव करता आली. यानंतर सॅमसन आणि सर्फराझ जोडीने चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. सॅमसनने २ चौकार आणि एका षटकारासह ६८ धावांची खेळी केली. सर्फराझने ५ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे इरफानुल्हा शाह आणि करामत अलीने प्रत्येकी २ बळी घेतले. अष्टपैलू खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्फराझ खानला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय संघाची पुढची लढत १७ फेब्रुवारीला स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे.
संक्षिप्त धावफलक :
भारत १९ वर्षांखालील संघ (सर्फराझ खान ७४, संजू सॅमसन ६८, इरफानुल्हा शाह २/३२) विजयी विरुद्ध पाकिस्तान १९ वर्षांखालील संघ (समी अस्लम ६४, इमाम उल हक ३९, दीपक हुडा ५/४१)
सामनावीर : सर्फराझ खान.