विनेश, साक्षी मलिक, पुनियासह ३० कुस्तीगीरांचे जंतर-मंतरवर आंदोलन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरन सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यात मध्यस्थी करून ब्रिजभूषण यांना हटविण्याची मागणी आंदोलक खेळाडूंनी केली आहे. ब्रिजभूषण यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
आपले हक्क आणि सुरक्षेसाठी, तसेच भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांच्या हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी भारतीय मल्लांनी बुधवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. ब्रिजभूषण आणि महासंघाविरोधात ऑलिम्पिकवीर मल्लांसह किमान ३० कुस्तीगीरांनी येथील जंतर-मंतरवर बुधवारी धरणे दिले. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, राष्ट्रकुल विजेती विनेश फोगट यांनी ‘ब्रिजभूषण शरन सिंह हटाव’ मोहीम सुरू केली आहे. साक्षी आणि विनेशने ब्रिजभूषण यांच्यासह काही प्रशिक्षकांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. ‘‘राष्ट्रीय सराव शिबिरात प्रशिक्षकांसह अध्यक्षांकडून महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण केले जाते. प्रशिक्षकांकडून गेली अनेक वर्षे हे सुरू आहे. अनेक युवा महिला कुस्तीगीरांनी ही तक्रार केली आहे. हा त्रास सहन कराव्या लागलेल्या किमान २० मुली मला माहिती आहेत,’’ असा दावा विनेशने केला. या खुलाशानंतर आपल्या जिवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीतीही तिने बोलून दाखविली. आम्हाला भारतीय कुस्ती महासंघाचे गुलाम व्हायचे नाही. पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्री कार्यालयाने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले, तरच हे आंदोलन थांबेल, अन्यथा हे आंदोलन असेच सुरू राहील अशी ठाम भूमिका या मल्लांनी घेतली आहे.
“७२ तासांत…”, विनेश फोगाटच्या आरोपानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश
ब्रिजभूषण यांनी मात्र आरोप फेटाळून लावले. ‘‘महासंघाकडून महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण करण्यात आले, असे केवळ विनेशचे म्हणणे आहे. तिच्याशिवाय अन्य कुठलीही महिला कुस्तीगीर असे म्हणत नाही. विनेशखेरीज एकही महिला कुस्तीगीर असे म्हणत असेल, तर त्या दिवशी मी स्वत: फाशी घेईन,’’ असे ब्रिजभूषण म्हणाले.
आमची लढाई महासंघाविरुद्ध आहे. महासंघ कुस्तीगीरांचा कुठलाही विचार न करता निर्णय घेते आणि ते लादते. हे आंदोलन मल्लांचे आहे. आमच्याबरोबर कुठलीही राजकीय व्यक्ती किंवा पक्ष नाही. जोपर्यंत अध्यक्षांना हटवले जात नाही, तोवर एकही मल्ल एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणार नाही. – बजरंग पुनिया
खेळाडू देशासाठी पदके जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, महासंघाने खेळाडूंचा कायमच अपमान केला. खेळाडूंना छळण्यासाठी मनमानी नियम तयार केले जात आहेत. महासंघाकडून खेळाडूंचे खच्चीकरण सुरू आहे. – साक्षी मलिक